वसई, दि. 27 : वसई-विरार शहरात आधार कार्ड केंद्र शोधता-शोधता नागरिकांची दमछाक होऊ लागली आहे. फेसबुकच्या माध्यमातून दररोज कोणी न कोणी आधार कार्ड केंद्र वसई परिसरात कोठे चालू आहे. याची विचारणा करत आहे. आधार कार्ड हा दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा पुरावा म्हणून ओळखला जात आहे. आधार कार्ड येण्यापूर्वी रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र हे त्या व्यक्तीचे ओळखपत्र मानले जायचे. आधार कार्ड व पॅनकार्डची सक्ती केल्यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत त्याची अत्यंत गरज भासू लागली आहे.
वसई-विरार परिसरात आधार कार्ड केंद्राची सुविधा अत्यंत अपुरी आहे. बी. एस. एन. लच्या गलथानपणामुळे व वीजेच्या लपंडावामुळे बरीचशी आधार केंद्र बंद स्थितीत आढळून येत आहेत. बरिचशी आधार केंद्र खाजगी ठेकेदारांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे हे ठेकेदार मनमानीपणे केंद्र चालवतात. यामुळे गल्ली बोलात चालणार्‍या झेरॉक्स मशीनची दुकाने यांनी ग्राहकांची अक्षरश: पिळवणूक करु लागले आहेत. ज्या आधार कार्डची शासकीय शुल्क 30 ते 35 रुपये असताना ग्राहकांकडून चक्क 200 ते 500 रुपयांची मागणी करतात. अडला नारायण गाढवाचे पाय धरी या म्हणीप्रमाणे नागरिकांना अधिक शुल्क देऊन आधार कार्ड घेण्यावाचून पर्याय उरत नाही. काही बँकांमध्ये लोकांना सकाळी 7 ते 9 दरम्यान रांगेत उभे राहुन टोकन घ्यावे लागते व त्यानंतर नंबर येण्यासाठी तासंनतास वाट बघावी लागते. महावितरणची वीज व बी. एस. एन. ल चे ‘नेट’ यावर सुद्धा अंकुश नसल्यामुळे अनेक केंद्र बंद पडली आहेत. काही केंद्रांवर नागगिकांची लूटमार होत असल्याच्या तक्रारी शासन दरबारी पोहचल्यामुळे शासनानेच वसईतील काही केंद्र बंद केली आहेत. काही नवीन केंद्रे परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत. वसई-विरार परिसरातील नागरिकांच्या लोकसंख्येच्या तुलनेत आधार कार्ड केंद्रांची संख्या नगण्याच आहे. वसई-विरार महापालिकेच्या सर्व प्रभागामध्ये व तहसिल कार्यालयात अधिकृत आधार कार्ड केंद्र वेळ व पैसा वाचेल यासाठी स्थानिक लोक प्रतिनिधींनी या प्रश्‍नाकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे.

One thought on “आधारकार्ड’साठी वसईकर झाले ‘निराधार’ महापालिकेत व तहसिल कार्यालयात आधारकार्ड केंद्र उभारण्याची नागरिकांची मागणी ?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *