
वसई (प्रज्योत मोरे) : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग समिती आय हद्दीत पारनाका येथे शासकीय भूखंडावर छाया लंच होम व परिसरात अन्य अनधिकृत बांधकामे झालेली असून सदर बांधकामे निष्कासित करून अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सदरच्या अनधिकृत बांधकामांबाबत अनेक तक्रारी प्रभाग समिती आय कार्यालयात दाखल झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग समिती आय हद्दीत पारनाका येथे शासकीय भूखंडावर छाया लंच होम व परिसरात अन्य अनधिकृत बांधकामे झालेली असून ही बांधकामे मच्छिंद्र लाड यांनी केली आहेत. छाया लंच होम हे हॉटेल मच्छिंद्र लाड यांच्या मालकीचे असून डॉ. सेरोजो यांची ही त्यात भागीदारी असल्याचे समजते.
छाया लंच होम व परिसरातील अनधिकृत बांधकामे ज्या जागेवर उभी आहेत ती जागा शासकीय असून पूर्वी या ठिकाणी ऐतिहासिक कार्यक्रम होत असत. फार पूर्वी या ठिकाणी एक मोठा टीव्ही लावण्यात आलेला होता. लोक येथे येऊन टीव्ही पहायचे. येथे एक चबूतरा ही होता. ते सर्व तोडून ही जागा हडप करून या ठिकाणी छाया लंच होम व अन्य अनधिकृत बांधकामे करण्यात आलेली आहेत.
सदर अनधिकृत बांधकामे निष्कासित करून बांधकाम धारकांवर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा.
सदर प्रकरणी आम्ही वसईकरतर्फे मिलिंद खानोलकर यांनी ही प्रभाग समिती आय कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे.
