
वाडा बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या विटांना भेंडे म्हणतात. वाडा बांधण्यासाठी पूर्वी कांही ठिकाणी मातीचे भेंडे तर काही ठिकाणी भाजलेल्या चपट्या सपाट विटा वापरत असतं. पूर्वी आपल्या पूर्वजांनी मातीचे परीक्षण करून विशिष्ट अंदाज बांधण्यासाठी स्वतःची अशी शैली विकसित केलेली होती. अनेक ठिकाणच्या मातीचे नमुने गोळा करून त्याच्या चाचण्या घेत.
जमिनीचे दोन प्रकार असतात. काळी जमीन आणि पांढरी जमीन. काळी जमीन म्हणजे शेती करण्यासाठी योग्य आणि पांढऱ्या मातीची जमीन ही राहण्यासाठी किंवा लोकवस्तीसाठी असे. या मातीमध्ये जनावरांचे शेण, कुजलेले वाळलेले गवत, झाडांचा पालापाचोळा, केरकचरा, राख एकजीव होऊन माणसांच्या, जनावरांच्या पशु पक्षांच्या, बैलगाडीच्या चाकामुळे वस्तीतील माती मळली जावून पांढरट माती तयार होत असे. झाडांसाठी, पिकांसाठी आवश्यक असलेले द्रव्य या मातीत नसल्याने ती नापीक बनते. अशीच माती पूर्वी बांधकामात वापरली जायची. कित्येक वेळेला माळावरची माती, मुरूम पावसाने वाहून या पांढऱ्या मातीत येऊन मिसळते.
पूर्वी पाणथळ जमिनीत उभे व आडवे चर खोदून घेतात, पावसाळ्यात पावसाचे पाण्याबरोबर माती वाहून त्या चरात बसते, पावसाळ्यानंतर चरात बसलेली माती काढून घेऊन त्या मातीमध्ये योग्य ते पदार्थ मिसळून ती माती बांधकामात वापरत असत. ज्या ठिकाणची माती उत्तम प्रकारची आहे असे लक्षात आल्यावर ती माती भेंडे किंवा विटा तयार करण्यासाठी वापरत असत. प्रथम ती माती चाळून घेत. चाळलेली माती २१ दिवस भिजत ठेवली जाई. त्यामध्ये बारीक रेती, गुळ, बेल, भेंडी, गाईचे शेण, डिंक, घोड्याची लीद, कात, ताग, उडदाचे पीठ, जवसाचे पाणी, गुगुळ, हिरडा, बेहरडा, आवळा, बाबळीच्या बिया, भोकराचा रस असे चिकटपणा निर्माण करणारे पदार्थ त्यात मिसळले जात. याचा हेतू मातीची जलरोधकता, चिकटपणा व ताकद वाढवणे आणि पिकांसाठी, वनस्पतीसाठी आवश्यक असलेले द्रव्य त्यातून नष्ट करणे हा असतो. त्यामुळे आजही मातीचे भेंडे असलेल्या भिंतीवर गवत, वनस्पती तग धरत नाहीत. माती एकजीव व मऊ होण्यासाठी ती रोज रेडा, हत्ती, बैल किंवा माणसं यांच्याकडून तुडवली जाई. माती एकजीव झाल्यावर त्याच्या विशिष्ट आकाराच्या विटा तयार करीत. अशा विटांना भेंडे असे म्हणतं.
खास कमावलेल्या पांढऱ्या मातीच्या भेंड्याच्या भिंती पुष्कळ ठिकाणी आढळतात. व कांही ठिकाणी भुईकोटांना व गांवकुसांना, वाड्यांनाही अशाच प्रकारची माती वापरलेली असते. ही माती साधारण पावसाने धुवून जात नाही इतकी मजबूत व चिकण असते. जुन्या भुईकोटाचे तटही ह्या मातीचे मोठ्या जाडीचे केलेले असत. दगडांची किंवा विटांची बांधलेली तटबंदी तोफेच्या गोळ्यांच्या तडाख्याने तटबंदीला खिंडार पडत असत. अशावेळी मातीचे जाड कोट टिकाव धरीत असत. तोफेचा गोळा आला तरी, भिंत जाड असल्यामुळे तोफेचा गोळा न फुटतां तो तिच्या पोटांतच गढून जात असे.
भेंड्याचे आकार वेगवेगळे असून खालच्या बाजूला मोठाले तर वरच्या बाजूला छोटे भेंडे असत. तयार झालेले भेंडे प्रखर उन्हामध्ये वाळविले जात. पावसाचा त्यावर प्रत्यक्ष परिणाम पाहण्यासाठी त्या पावसात भिजत ठेवत. किंवा पाण्याच्या धारेखाली धरून त्याची परीक्षा घेतली जाई. वाळलेल्या भेंड्यावर टिकावाचे अथवा पहारीचे घाव घातले असता, मार लागला तेवढा छोटासा टवका उखडला जातो. एक भेंडा एका व्यक्तीला उचलणार नाही याची खात्री केली जाई. अशा पद्धतीने भेंडे तयार करत व चाचण्याही करत असत.
पूर्वी बांधकामात सिमेंट वापरले जात नव्हतं. त्याला पर्याय होता पांढरी माती. ही माती चिवट असायची. उन, वारा,पाऊस, धरणीकंप यांचा तडाखा सोसून गेली तीनचारशे वर्षे झाली तरी पांढऱ्या मातीच्या भिंती, बुरुज, वाडे, गढ्या आजही सुस्थितीत आहेत. आत्ताच्या सिमेंटलाही मागे टाकेल अशी ही पांढरी चिवट माती यावर संशोधन व्हायला पाहिजे.
वाड्याचे बांधकाम करताना परिसरातील सहज उपलब्ध होणारे दगड, माती, विटा, चुना, लाकूड मनुष्यबळ, कारागीर यांचा वापर करण्यावर भर असे. अशा सोयी बरोबर संरक्षण हा घटक देखील महत्वाचा मानला गेला आहे.
माती कोणतीही असो त्यामध्ये बिया रुजतात, गवत उगवते, झाडे उगवतात परंतु वाड्याच्या बांधकामासाठी वा बुरुजासाठी मातीचे जे मिश्रण तयार केले जाते त्यामध्ये साधे गवत सुद्धा उगवत नाही. गड, किल्ले, वाडे, गढ्या बांधणीसाठी दगडाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे आपण बघतो. याच दगडामध्ये वाढलेल्या झाडांमुळे तटबंदी, भिंती, बुरुज ढासळलेले आपण बघतो.
परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात माती वापरून देखील त्यामध्ये गवत, अथवा इतर झाडे वाढली नाहीत हे आश्चर्यजनक आहे. जर का झाडे वाढली असती तर असे अजस्त्र भिंती, बुरुज केव्हांच ढासळले असते. आता असा प्रश्न पडतो की, तीनचारशे वर्षापूर्वी अस कोणते तंत्रज्ञान या मातीच्या निर्माणासाठी वापरलं होतं की, त्यामुळे ही माती दगडापेक्षा ही दणकट बनवली गेली. आज इतक्या वर्षानंतरही या मातीत गवत देखील उगवत नाही. अशा अप्रतिम निर्माण कर्त्याला मानाचा मुजरा.
धन्यवाद.
विलास भि. कोळी यांच्या “वाडा” या पुस्तकातून. पुस्तकासाठी संपर्क
विलास भि. कोळी :- 9763084499
