बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग हवालदिल झालेले आहे. शिक्षण,रोजगार, नोकरी, महागाई असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.आणि त्यामुळे प्रत्येक कुटुंबाची आर्थिक घडी पार विस्कटून गेली आहे. अनेक कुटुंबांनी आपले जवळचे आप्तेष्ट,नातेवाईक गमावलेले आहेत. अनेक कुटुंबांचा कर्ता गेल्याने ते कुटुंब निराधार झालेले आहेत. काही कुटुंबामध्ये तर आई वडील हरपल्याने मुलांचे छत्र नाहीसे झालेले आहे.
शिक्षक, पोलीस, डॉक्टर, नर्स, पत्रकार,शेतकरी, शासकीय अधिकारी असे समाजातील अनेक महत्वाच्या घटकातील व्यक्ती सुध्दा या कोरोना महामारीमुळे जीवाला मुकले आहेत. कोरोना संकटाची अशी भयानक आणि भयंकर परिस्थिती असून सुध्दा आपले पत्रकार बंधू,भगिणी त्यांच्या कर्तव्यापासून तसूभरही मागे हटलेले नाहीत. आपल्या पत्रकार बंधू,भगिनींनी लोकांचे प्रश्न सातत्याने शासनाकडे पोहचविले आहेत. अनेक प्रश्न सोडविण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. सर्व जनतेला घरबसल्या रोजच्या घडामोडी बातमीच्या आधारे रोज कशा उपलब्ध करून देता येतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत.
पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता किंवा आपल्या कुटुंबाचा विचार न करता आपले पत्रकार बंधू,भागिणी कोरोना महामारीमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहेत. पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून मान्यता देण्याबाबत शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे,आणि शासन नक्कीच त्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल असा मला विश्वास आहे. आणि म्हणूनच वरील सर्व परिस्थिती विचारात घेता लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र दैनिक रायगड लोकशक्ती यांचे वतीने माझ्या पनवेल आणि माणगांव तालुक्यातील पत्रकार बंधू भगिनींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी, त्यांना प्रोत्साहन द्यावे,त्यांना प्रेरीत करावे,त्यांचा यथोचित सन्मान करावा, सत्कार करावा अशी माझी भावना झाली आहे. त्याकरीता माझे नम्र आवाहन आहे की,आपण सर्वांनी आपल्या पत्रकारितेतील कार्याची संक्षिप्त माहिती फोटोसह माझ्या वैयक्तिक व्हाॅट्सअप वर किंवा खालील नमूद ईमेल आयडीवर चार दिवसांत पाठवावी. त्यानंतर लगेचच सत्कार कार्यक्रमाचा दिनांक, वेळ,व ठिकाण निश्चित करण्यात येईल. कृपया सहकार्य करावे हि नम्र विनंती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *