
आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांचे निलंबन करा!
वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख यांची मागणी
प्रतिनिधी
विरार- २५ लाख लोकसंख्या असलेल्या वसई-विरार महापालिका क्षेत्रात आतापर्यंत केवळ तीन लाख नागरिकांचेच लसीकरण झाले आहे. अन्य महापालिकांच्या तुलनेत वसई-विरार महापालिकेचे हे मोठे अपयश आहे. यासाठी पालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांना जबाबदार ठरवून त्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी जोरदार मागणी वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख यांनी केली आहे.
वसई-विरार महापालिकेच्या कोविड-१९ लसीकरण मोहिमेचा सुरुवातीपासूनच बोजवारा उडाला आहे. पहाटेपासून लसीकरण केंद्रावर रांग लावूनही नागरिकांना लस मिळालेली नाही. या दरम्यान प्रत्येक वेळी आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांचा निष्काळजीपणा दिसून आला आहे.
लसीकरण मोहिमेबाबत त्यांनी कधीही जनतेसोबत समन्वय ठेवण्याची; त्यांच्यात जागृती करण्याची किंवा जनतेला योग्य ती माहिती देण्याची तसदी घेतली नाही. याचे परिणाम म्हणून शहरात कोरोना संक्रमण वाढत राहिले व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आलेल्या ‘मोबाईल लसीकरण बस’वर तब्बल तीन लाख रुपये खर्च करूनही याद्वारे अपेक्षित लसीकरण करण्यात पालिकेला यश आलेले नाही.
वसई-विरार महापालिकेने १७ मे ते २ जुलै या कालावधीत ‘मोबाईल लसीकरण मोहीम’ राबवली होती. पालिकेच्या नऊ प्रभागांत ही मोहीम राबवण्याकरता पालिकेने परिवहनच्या नऊ बस भाड़ेतत्त्वावर घेतल्या होत्या. या बसकरता पालिकेने प्रतिदिन ६,३१० रुपये भाड़े (अधिक पाच टक्के जीएसटी ) मोजले होते.
मात्र अवघ्या काही दिवसांतच ही मोहीम बंद पडली होती. ही मोहीम बंद करण्याचे कोणतेही कारण पालिकेने सांगितले नव्हते. उलट पालिका अधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव दिसून आला आहे. लसीकरण मोहिमेच्या उडालेल्या बोजवाऱ्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
खरे तर हे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांचे अपयश आहे. आता तर लस उपलब्ध नाही, असे सांगत डॉ. वाळके ही मोहीमच गुंडाळून त्याचे खासगीकरण करु पाहत आहेत. त्यामुळे या सगळ्याला डॉ. सुरेखा वाळके यांना जबाबदार धरून त्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी तसनीफ़ नूर शेख यांनी पालिका आयुक्त गंगाथरन डी. व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकड़े केली आहे.