

वसई : (प्रतिनिधी) : मे ते ऑगस्ट हा काळावधी मत्स्यप्रजननाचा काळ असल्याने या काळात शासनाकडून समुद्रात मासेमारी करण्यास कायदेशीर निर्बंध असतात. त्यामुळे मे ते ऑगस्ट या महिन्यात पट्टीच्या मांसाहार खवय्यांना गोड्या पाण्याच्या मासळीवर अवलंबून रहावे लागते. मात्र यंदा गोड्या पाण्याच्या मासळीलाही महागाईची झळ बसल्याने खवय्यांनी सुक्या मासळीसह खाडीच्या मासळीवर ताव मारला आहे. सध्या बाजारात येणारा तलावातील कटला मासा हा खाण्यास अधिक रूचकर आणि स्वस्त असल्याने या माशाच्या खरेदीला भलतीच डिमांड चढली आहे. तलावाच्या पाण्यात सहज उपलब्ध होणारा कटला मासा तसेच खरबी, चिचे, करवाली यासारखे गावठी बारीक मासे सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. हे मासे खरेदी करण्यासाठी मुंबईहून नागरिक बाजारात गर्दी करू लागलल्याचे चित्र दिसून येते.
दरवर्षी पावसाळ्यात सलग दोन ते अडीच महिने होणारी मासेमारी बंदी लक्षात घेता या काळातील उदरनिर्वाहासाठी मच्छिमार उन्हाळ्यापासूनच तयारीला लागतात. या काळात मोठ्या प्रमाणावर मासळी खारवून सुकविली जाते. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने ग्राहकांना सुक्या मासळीशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे ही सुकवलेली मासळी याच दरम्यान मोठ्या प्रमाणावर वसईच्या बाजारात विकण्यासाठी उपलब्ध होते. सध्या वसईच्या बाजारपेठांमध्ये सुक्या मच्छीचे आगमन झाले असून वसई, विरार, अर्नाळा, पापडी, आगाशी येथील मासळी बाजार सुक्या मासळीने गजबजून गेले आहेत. वसई तालुक्यातील अर्नाळा हे मासेमारी बंदर प्रसिद्ध आहे. येथे मिळणारी सुकी मासळी विशीष्ट पद्धतीने सुकवली जात असल्याने येथील सुक्या मासळीला मुंबईपर्यंत मागणी आहे. ओल्या मासळीचा बाजारही येथे भरत असला तरी विशेष करूनसुक्या मासळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या येथून उपलब्ध होणारे सुके बोंबील 400 ते 450 रूपये शेकड्याने विकले जातात. ओल्या मासळीलाही काही ठिकाणी महागाईची झळ सोसावी लागल्याने पावसाळ्यात सुक्या मासळीला मागणी वाढू लागली आहे.
दुसरीकडे पावसाळी मासेमारीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने स्थानिक तरून खाडी, तलाव किंवा ओहोळात जाळे टाकून, गळाच्या साह्याने मासेमारी करून ती विकण्यासाठी बाजारात आणू लागले आहेत. खास करून तलावातील खवळे, गाबोळी, डोम, काळा मासा, डाकू, सुळे, गवत्या, कटला, राहू, मृगळ, चंदेरा आदी मासे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे या मासळ्यांवर खवय्यांची नजर असते. वसई पश्चिमेला असणारी खाडी, सोपारा खाडी यासह अन्य ठिकाणी तरुणाई मासे पकडण्यासाठी जातात. बाजारात ही मासळी 140 ते 150 रुपये किलोने विकण्यात येते. बाजारात आलेल्या चिवणी माशांच्या 4 ते 5 नगांच्या वाट्याला 100 रुपये, तर 7 ते 8 मध्यम स्वरूपाच्या एका वाट्याला 200 रुपये, मोठ्या आकाराच्या 6 ते 7 चिवणी असलेल्या एका वाट्याला 500 रुपये तर मोठी अंडी वाल्या वाट्याला 1000 रुपये मोजावे लागत आहेत.