
मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पूरस्थिती उद्भवली. कोकणातही अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली. महाड-तळीये गावासह आसपासची अन्य दोन गावे जमिनीखाली गड़प झाली. रायगडमध्ये ५३, रत्नागिरी जिल्ह्यात तीन जणाचा बळी गेला आहे. तर रायगडमधील ४३ आणि रत्नागिरीतील १७ जण अद्यपा बेपत्ता आहेत.
संपूर्ण चिपळूण शहर पाण्याखाली गेल्याने हजारो कोकणवासीय बाधित झाले आहेत. कोटयवधी रूपयांची वित्तहानी झाली आहे. अर्थात; हे नुकसान भरून न येणारे आहे.
मुळातच कोकणी माणूस ‘आत्मसन्मानी’ आहे. त्यामुळे तो सहसा मदतीची याचना कुणाकडे करणार नाही. तशी त्याने ती कधीच केली नव्हती. आपल्या मीठ-भाकरीत आनंदी आणि सुखी असलेल्या या माणसाने आपल्या नेत्यांवर मात्र भरभरून प्रेम केले.
कोकणी माणसाच्या या पक्षप्रेमामुळेच आज कित्येक जण नेते आणि मंत्री पदापर्यन्त पोहोचले. हे नेते-मंत्री श्रीमंत झाले. राजकीय पक्ष मोठे झाले. या ताकदीवर त्यांनी आणखी सत्ता आणि संपत्ती उपभोगली.
पण कोकणी माणूस मात्र फाटक्यात राहिला. येणारे वादळ-वारे झेलत राहिला. पावसात भिजत राहिला. या राजकीय पक्षांच्या राजकीय ताकदीचा आणि नेत्यांच्या श्रीमंतीचा त्याला काडीचा फायदा कधीच झाला नाही. त्यानेही त्याची अपेक्षा कधी केली नाही. त्यामुळे कोकणी माणसाला गृहीत धरले गेले.
कालच्या पावसाने तर त्याच्यावर आभाळ कोसळले आहे. आपली जीवाभावाची माणसे क्षणात जमिनीत गड़प झालेली पाहून त्याने फोडलेला टाहो आकाशाला भिडला. त्या गरीबांनी पाहिलेली अंसख्य स्वप्न क्षणात जमिनीत विरली गेली. हे विदारक चित्र पाहून त्या विधात्यालाही आपली चूक लक्षात आली असेल. पण राजकीय नेत्यांच्या हृदयाला मात्र कुठेच पाझर फुटलेला दिसला नाही.
सामाजिक संस्था आणि वैयक्तिक पातळीवर अनेकांनी कोकणकरता मदत पाठवली.।पाठवत आहेत. पण राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी मात्र जनतेलाच मदतीचे आवाहन करून आपल्या कोत्या वृत्तीचे दर्शन घडवून आणले.
मागील दोन वर्षे सामान्य माणूस कोरोना संकटातून सावरतो आहे. त्यातही त्याने राजकीय पक्षांच्या हाकेला ओ देत आपले दातृत्व दाखवले आहे. पण कोकणी माणसांच्या मतावर-त्याच्या ताकदीवर मोठ्या झालेल्या नेत्यांनी आपल्या गंगाळीतून भर टाकण्याची तसदी घेतलेली नाही. आपल्या माणसाची जबाबदारी घेतलेली नाही.
ठरवले तर नुकसान झालेला कोकणी माणूस क्षणात उभा राहील. आज मुंबईसह आजूबाजूच्या परिसरांत अनेक कोकणातील नेते आहेत. अनेकांची जन्मगावे कोकणात आहेत. कोकणी माणसांच्या आशीर्वादाने विविध पदे भूषवत आहेत.
एरव्ही कोकणची बांधिलकी सांगणारे हे नेते मात्र संकटावेळी मात्र काढता पाय घेतात. जनतेच्या मदतीवर आपली लेबले लावतात. खरे तर सरकारी मदतीवर आणि त्यांच्या अहवालावर रांगणारी आपल्या नेत्यांची जात. त्यामुळे ते स्वतःच्या खिशात हात घालतील, अशी सूतराम शक्यता नाही.
तशा मदतीची घोषणा झाली तर…. तो सुदिन म्हणावा लागेल!