
अतिशय महत्त्वाची कर्जवसुली थकली
… तर ऑफिसर्स असोसिएशन रस्त्यावर उतरणार
विरार- संचालक मंडळातील आपापसातील द्वेष, दुही व संचालकांकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे होणारे खच्चीकरण यामुळे वसई तालुक्यातील अग्रगण्य अशा १५ हजार कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या आणि वसईतील ख्रिस्ती समाजाने प्रचंड मेहनतीने उभ्या केलेल्या बसिन कॅथॉलिक को. ऑ. बँकची विश्वासार्हता धोक्यात येण्याची शक्यता आहे.
संचालक मंडळातील विसंवादाबाबत बसिन कॅथॉलिक को. ऑ. ऑफिसर्स असोसिएशनने चिंता व्यक्त केली असून; बँकेच्या उत्तरोत्तर व सर्वांगीण विकासासाठी संचालक मंडळ एकत्रित न आल्यास नाइलाजास्तव आम्हाला बँकेच्या संवर्धन व संरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराच ऑफिसर्स असोसिएशनने पत्राद्वारे संचालक मंडळाला दिला आहे.
संचालक मंडळाच्या दुहीमुळे बोर्डाच्या सभेत गोंधळ घातला जात आहे. संचालक मंडळाच्या सभा होत नाहीत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे अतिशय महत्त्वाची अशी थकित कर्जवसुली होत नसल्याचे अधिकाऱ्यांनीच मान्य केले आहे.
याशिवाय नवीन कर्ज प्रस्ताव, मंजुरी व वितरण, कॅश क्रेडिट कर्जाचे वितरण, कर्मचारी अंतर्गत बढ़ती व विविध विभागांसाठी नवीन नोकर भरती, हे विषय दुर्लक्षित होत असल्याची खंत ऑफिसर्स असोसिएशनने या पत्रातून
व्यक्त केली आहे.
रिझर्व्ह बँकेने बसिन कॅथॉलिक को. ऑ. बँकेच्या सर्वंकष आर्थिक निकषाबाबत समाधान व्यक्त केले आहे. मात्र संचालक मंडळातील दुही, विसंवाद व सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या दफ्तरी गेलेल्या तक्रारींवर बोट ठेवण्यात आल्याने ही बाब चिंताजनक आहे. खातेदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होऊन त्याचा परिणाम बँकेच्या विश्वासार्हतेवर होऊ शकतो, अशी चिंता असोसिएशनने व्यक्त केली आहे.
दरम्यान; बँकेची पत म्हणजे प्रगती, लोकांचा विश्वास, निष्ठा म्हणजे बँकेचा पाया आहे. त्यामुळे आपसातील मतभेदावर तड़जोडीने सुवर्णमध्य काढावा आणि बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावे; अशी विनंती ऑफिसर्स असोसिएशनने संचालक मंडळाला केली आहे.