ही लूट थांबवण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांसाठीचे दर निश्‍चित करा

वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख यांची आरटीओकड़े मागणी

प्रतिनिधी

विरार- गणेशोत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आतापासूनच १४०० रुपये तिकीट दर सांगितला जात आहे. ऑगस्ट महिन्यात हाच दर १००० रुपयांपर्यंत आहे. खासगी ट्रैवल्सच्या दरांत कुठेच एकवाक्यता नाही. त्यामुळे परिवहन विभागाशी संगनमत करून खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या गणेशोत्सव काळात चाकरमान्यांची करत असलेली ही लूटमार थांबवावी, अशी मागणी वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख यांनी विरार उपप्रादेशिक परिवहन विभागाकड़े केली आहे.

एसटीचा गोंधळाचा कारभार आणि नसलेली अन्य वाहतूक व्यवस्था यामुळे एसटीने जाणे कोकणवासीयांना शक्य होत नाही. त्याच वेळी रेल्वेनेही जाणे शक्य होत नाही. अशा वेळी कोकणातील चाकरमानी गणेशोत्सवासाठी विरार येथून सुटणार्‍या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसने कोकणात ये-जा करण्याचा मार्ग निवडतात.

मात्र कोकणवासीयांच्या भावनिक अडचणीचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या चाकरमान्यांची प्रचंड प्रमाणात आर्थिक लूटमार करत आहेत. पुढील महिन्यात गणेशोत्सव असल्याने चाकरमान्यांनी आतापासूनच आगाऊ बुकिंग करून ठेवण्यास सुरुवात केली आहे.

मात्र वाढलेले डिझेल दर, कोरोनामुळे झालेले नुकसान आणि पोलीस व आरटीओला द्यावे लागणारे हफ्ते ही कारणे देत ट्रैवल्स कंपन्यांनी आतापासूनच हा दर १४०० रुपयांवर नेऊन ठेवला आहे.

विशेष म्हणजे राज्य सरकारच्या २०१८च्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग
परिवहन महामंडळाचे भाड़े राज्य परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित करण्यात येते.

सदर भाड़ेदर विचारांत घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे संपूर्ण बससाठी प्रति किमी भाड़ेदर त्याच स्वरुपाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग
परिवहन महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किमी भाड़ेदराच्या ५० टक्केपेक्षा राहणार नाही, असा कमाल भाड़ेडर निश्चित केलेला आहे.

महाराष्ट्र सरकारचा शासन निर्णय क्रमांक-एमव्हीआर-०४१२/प्र.क्र.३७८(पु. बा.०७)/परि-२. विचारांत घेऊन विरार उपप्रादेशिक विभागाने या संबंधीची दरनिश्चिती व जनजागृती करणारे फलक खासगी ट्रैवल्सच्या बुकिंग कार्यालयांजवळ लावावेत, अशी मागणी तसनीफ़ नूर शेख यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *