

वार्ताहर – नोकरदार वर्गाला पीएफशिवाय, सरकारकडून ईएसआयसी (ESIC)अर्थात राज्य कर्मचारी विमा योजना दिली जाते. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसह इतरही फायदे दिले जातात. ESIC कर्मचारी विमा योजना आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही आरोग्य विमा योजना आहे. ज्या संस्थेमध्ये १० ते २० कर्मचारी किंवा त्याहून अधिक कर्मचारी असल्यास ही योजना लागू होते. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना चालविली जाते. ESIC मध्ये कर्मचारी आणि कंपनी, या दोघांच्या रक्कमेचं योगदान असतं. ही रक्कम वेळो-वेळी बदलत असते. सध्या ईएसआयसीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ०.७५ टक्के योगदान दिलं जातं आणि कंपनीकडून ३.२५ टक्के योगदान असतं. ज्या कर्मचाऱ्याचं दररोजचं वेतन १३७ रुपये आहे, त्यांना आपल्या वेतनातील योगदान द्यावं लागत नाही. ईएसआयसीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनाची मर्यादा आहे. २१ हजार रुपयांपर्यंत वेतन असलेले कर्मचारी या योजनेंतर्गत येतात, या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यापूर्वी मासिक वेतनाची मर्यादा १५ हजार रुपये इतकी होती. परंतु २०१६ मध्ये ती वाढवून २१ हजार रुपये करण्यात आली.
वसई विरार परिसरात साधारणतः ४-५ लक्ष कामगार कार्यरत असून त्यातील साधारणतः १-२ लक्ष कामगार हे ESIC योजने अंतर्गत समाविष्ट आहेत. ESIC योजनेंतर्गत कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबाला वैद्यकिय सुविधा पुरवल्या जातात. तब्येत बिघडल्यास मोफत इलाजाची सुविधा मिळते. ESICच्या रुग्णालयात कर्मचाऱ्यांना मोफत इलाज केला जातो. गंभीर आजार असल्यास खासगी रुग्णालयात पाठवले जाते. खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर इलाजाचा संपूर्ण खर्च ESICद्वारा केला जातो. वसई विरार मध्ये एकच खासगी रुग्णालय या योजनेत आहे परंतु ते अपुरे पडत आहे. बर्न केअर सेंटर, कॅन्सर सेंटर, हृदयरोग, ट्रॉमा केअर सेंटरयुक्त अशा प्रकारच्या सुविधा एकच छताखाली असलेलं अद्यावत कामगार रुग्णालय येथे असणे आवश्यक आहे.
आज केंद्रीय उद्योग मंत्री श्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली असता आमची वसई उद्योजक समूह चे श्री पराग तोडणकर यांनी कामगारांच्या आरोग्याची चिंता व्यक्त करत ESIC चे स्वतंत्र असे अद्यावत सुविधा असलेले कामगार रुग्णालयाची मागणी केली. उद्योग धंद्याची भिस्त ही कामगारांवर देखील अवलंबून आहे ही गरज ओळखता श्री पराग तोडणकर व श्री प्रमोद दवे यांनी आमची वसई रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार श्री प्रसाद लाड, आमदार श्री संजय केळकर यांच्या समक्ष केंद्रीय उद्योगमंत्री श्री नारायण राणे यांना निवेदन सादर केले. उद्योगमंत्री श्री नारायण राणे यांनी सदर प्रस्ताव राज्य सरकारकडे देऊ असे आश्वासन दिले.