
◆ व्यसनमुक्तीचे बंधन …! व्यसनांपासून रक्षण…!’
▪️सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र यांची रक्षाबंधनाच्या निमित्ताने मागणी
रक्षाबंधन हा बहिण भावाच्या नात्याला अजून घट्ट बंधनात बांधणारा सण. भारतीय संस्कृतीत या सणाचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. याच निमित्ताने नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सर्व जिल्ह्यातील समस्त महिला वर्गाच्या वतीने एक आगळंवेगळं रक्षाबंधन साजरं होतंय. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना महाराष्ट्रातील महिलांचे व्यसनांच्या दुष्परिणामापासून रक्षण करावे आणि संपूर्ण महाराष्ट्रात व्यसनमुक्तीसाठी पूरक वातावरणाची निर्मिती करावी, या मागण्यांसाठी व्यसनमुक्तीची राखी बांधण्यात येत आहे.
व्यसनी व्यक्ती स्वतः अधोगतीला जातेच शिवाय त्याचा दुष्परिणाम त्याच्या संपूर्ण कुटुंबावर तसेच समाजावरही होतो. दरवर्षी कित्तेकजण व्यसनांच्या गर्तेत अडकून अर्ध्यावरूनच जीवनयात्रा संपवून जातात. परंतु त्यांच्या मागे उरलेल्या संसाराची प्रामुख्याने महिलांची संसार सांभाळताना आणि मुलांना वाढवताना अवघड स्थिती होऊन जाते. त्यामुळेच या व्यसनांच्या जाळ्यात अडकलेल्यांना व्यसनमुक्तीच्या दिशेकडे घेऊन जात महाराष्ट्र व्यसनमुक्त करावा, अशी मागणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे नशाबंदी मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
‘व्यसनमुक्तीचे बंधन व्यसनांपासून रक्षण’ या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रातील महिलांचे व्यसनांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून रक्षण करावे आणि संपूर्ण महाराष्ट्रात व्यसनमुक्तीसाठी पूरक वातावरणाची निर्मिती करावी. निदान देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात आपल्या भगिनींची व्यसनामुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका करण्याचे तसेच बालके आणि युवा पिढी व्यसनमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आपण सामाजिक न्यायमंत्री म्हणून रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्हास द्यावे, अशी मागणी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील समस्त महिला वर्गाच्या वतीने धनंजय मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
जिल्हा पातळीवर मंडळाच्या संघटक यांच्या वतीने जिल्ह्यातील अधिकारी ,पदाधिकारी व लोक प्रतिनिधी यांना राख्या बांधून व्यसनमुक्तीचे बंधन ..! व्यसनांना पासून रक्षण ..! अशी माहिती नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक श्री मिलिंद रूपचंद पाटील यांनी दिली आहे.