
पालघर दि. 02 : गणेश उत्सवासाठी पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी हे कोकणात जात असतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षी पालघर विरार/बोईसर/वसई या भागातील प्रवासी कोकणात जाणार आहेत. प्रवाशांची संख्या लक्षात घेता एस.टी. महामंडळाच्या बसेस शिवाय प्रवासी हे खाजगी बसेसमधूनही प्रवास करत असतात. त्यामुळे खाजगी बस चालक हे प्रवाश्याकडून जास्त भाडे आकारण्याची शक्यता नाकारता येत नाही. खाजगी बसचालकांना एस.टी महामंडळाच्या बसेसच्या भाड्यापेक्षा जास्तीत जास्त दीड पट भाडे आकारण्याची मुभा आहे.
त्याअनुषंगाने बस चालकांना सुचित करण्यात येते की, त्यांनी प्रवाश्यांकडून एस.टी महामंडळाच्या बसच्या भाड्याच्या जास्तीत जास्त दीड पट भाडे पेक्षा जास्त भाडे आकारणी करु नये. त्यापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्याचे या कार्यालयाच्या तपासणी पथकास आढळून आल्यास किंवा तश्या प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास आपणा विरूध्द मोटार वाहन कायद्या मधील तरतुदीच्या अनुषंगाने कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
तसेच खाजगी बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, आपण खाजगी बस चालकाना एस.टी. महामंडळाच्या बसेसच्या भाड्याच्या जास्तीत जास्त दीड पट पेक्षा जास्त भाडे देवू नये. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वसई यांनी केले आहे.
