
केंद्रातील मोदी सरकारने केलेले शेतकरी विरोधी, कामगार विरोधी आणि जन विरोधी कायदे आणि चुकीची धोरणे रद्द करावीत अशा विविध मागण्यांसाठी आज २७ सप्टेंबर रोजी भारत बंदला भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा) तर्फे शेतकरी संघटनेच्या भारत बंदला सक्रिय पाठिंबा देत सकाळी वसई एसटी स्थानकात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. पाऊस पडत असतानाही कार्यकर्त्यांनी पावसात भिजत तेथून घोषणाबाजी करत वसई तहसीलदार कार्यालय गाठून जोरदार निदर्शने केली. पावसामुळे निदर्शकांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच ठाण मांडून निदर्शने केली. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांना जाऊ देण्यात आले. मात्र कुणीही जागेवरून हटले नाही. निदर्शकांमध्ये लाल बावटाचे कॉ. शेरू वाघ, अरुणा मुकणे, निर्मला चौधरी व भाकपच्या कुंदा नीलकंठ आदी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

नायब तहसीलदार प्रदीप मुकणे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी आदिवासी समाजाच्या लोकांचे पिढ्यानपिढ्या शासकीय आणि खाजगी जमिनींवर असलेले अतिक्रमण नियमित करण्याबाबत आपण प्रशासनाशी बोलू.
तसेच आदिवासी जातीचे दाखल्याविषयी मानवी दिनांकाची अट याबाबत जागेवर जाऊन पाहणी करून दाखले दिले जातील, ऑफलाईन रेशनकार्डबाबत संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत एक महिन्यात ऑनलाईन रेशनकार्ड करून देण्याचे आश्वासन मुकणे यांनी निदर्शकांना दिले.