
वसईतील वाल्मिकी नगरमध्ये पालिकेकडून अखेर साफसफाई
प्रतिनिधी
विरार- वसई भाजप अल्पसंख्याक तसनीफ़ नूर शेख यांचा पालिकेची कानउघाडणी करत पालिकेची बेफिकिरी चव्हाटयावर आणल्यानंतर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता या परिसरात सफाई मोहीम राबवली.
तुंबलेली शौचालये, पराकोटीची अस्वच्छता, रस्तोरस्ती साचलेला कचरा, पावसामुळे रस्त्याची झालेली दुर्दशा आणि पथदिव्यांअभावी परिसरात रात्री असलेला अंधार अशा दुष्टचक्रात वसईतील वाल्मिकी नगर हा आदिवासीबहुल भाग सापडला होता. याबाबत अनेकदा वसई-विरार महापालिकेकड़े तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली होती.
वसईतील वाल्मिकी नगर हा पाचशे लोकवस्तीचा भाग आहे. यातील बहुतांश लोक हे आदिवासी समाजातून आहेत. हा भाग वसई-विरार महपालिकेच्या ‘आय’ प्रभागांत मोडतो; मात्र या प्रभागाला कोणत्याही सुविधा पुरवण्यात येत नसल्याने येथील नागरिकांत वसई-विरार महपालिकेप्रति नाराज आहेत.
या परिसरात आधीच रस्त्याची वाणवा आहे. आहेत त्या रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्यात चिखल झाला आहे. हा परिसर झोपडपट्टीने व्यापलेला असल्याने रस्त्यारस्त्यावर साचलेला कचरा पालिकेकडून उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या.
वाल्मिकी नगर मागील काही महिने या समस्यांच्या दुष्टचक्रात असताना वसई-विरार महापालिका मात्र याकडे लक्ष देत नसल्याने मंगळवारी वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख व सहकाऱ्यांनी पालिकेचा कारभार चव्हाटयावर आणला होता.
या बाबतचे वृत्त प्रसार माध्यमांत छापून आल्यानंतर पालिकेने बुधवारी सकाळी धावपळ करत या भागात सफाई मोहीम राबवून आपली बेफ़िकिरी पांघरुण घालून झाकण्याचा प्रयत्न केला आहे.