शिवसेना युवानेता पंकज देशमुख यांचे आयुक्त गंगाथरन डी. यांना पत्र

प्रतिनिधी

नालासोपारा- पुढील १५-२० दिवसांत वसई आणि परिसरात भातकापणी आणि अन्य शेतीकामांना सुरुवात होईल. या कामांदरम्यान शेतकरी आणि शेतमजुरांना विंचूदंश, सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेच्या आरोग्य केंद्रांत त्यावरील औषधे, लस व इतर वैद्यकीय साहित्य उपलब्ध असायला हवे, अशी अपेक्षा शिवसेना युवानेते पंकज देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात देशमुख यांनी वसई-विरार महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांना पत्र लिहिले असून; वसई आणि परिसरातील शेतकरी आणि शेतमजूर यांची काळजी घेण्याची विनंती केली आहे.

वसई आणि परिसरात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. नालासोपारा पश्चिमेकडील भुईगाव, गास, निर्मळ, नाळा, मर्देस, वाघोली, नवाळे, कळंब, राजोडी, उमराळे-करमाळे ही गावे तर खास भातशेतीकरता ओळखली जातात.

येत्या १५-२० दिवसांत भातकापणी आणि त्या संलग्न कामांना सुरुवात होईल. या काळात अनेक शेतकरी आणि आदिवासी शेतमजूर भात कापणीच्या कामांना जातात. त्यावेळी शेतकऱ्यांना व आदिवासी मजुरांना विंचूदंश, सर्पदंश होण्याची शक्यता असते.

एखाद वेळेस अनुचित प्रकार घडल्यास विंचूदंश, सर्पदंशावरील लस, औषधं किंवा अन्य उपचार वेळेवर उपलब्ध न झाल्यास संबंधित शेतकरी अथवा शेतमजूर यांच्या जीवाला धोका संभवू शकतो.

म्हणूनच वसई-विरार महापालिकेची रुग्णालये व सर्व आरोग्य केंद्रांत विंचूदंश, सर्पदंशावरील लस, औषधं व अन्य वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी या पत्राद्वारे पंकज देशमुख यांनी पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *