अर्नाळा पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप मोकाटच

आरोपींना गजाआड नाही केले तर आंदोलन छेडण्याचा लाल बावट्याचा इशारा

मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी फिर्यादी आदिवासी पीडित महिला (वय ३५) ही आपल्या नऊ वर्षांचा मुलासह आपल्या वडिलोपार्जित घरी अर्नाळा, विरार (प) येथे राहते. दि. ७/१०/२०२१ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पीडित महिला ही घरी स्वयंपाक करीत असताना जवळच राहणारे भगवान चिमण चव्हाण (वय ४०) आणि सनी चिमण चव्हाण (वय ३०) हे पीडित महिलेचा लहान भाऊ कैलास पवार (वय २०) रा. भिवंडी असे तिघेजण तेथे आले आणि अर्वाच्य शिवीगाळ करून तिला घराबाहेर घालावण्यासाठी बळजबरी करू लागले. तेथे उपस्थित असलेले भगवान व त्याचा भाऊ सनी हे घरात घुसले. त्यांनी वाद घालून तू कशी निघणार नाहीस आम्ही आता बघतो असे म्हणत तुझा भाऊ कैलास याने आम्हाला हे घर विकलेले आहे. मी त्याचे पैसे मोजले आहेत. घराची कागदपत्रे माझ्याकडे आहेत असे बोलून अर्वाच्य शिवीगाळ केली. तिला घरातून बाहेर खेचू लागले. घरात असलेले कपडे व भांडी व इतर समान घराबाहेर फेकून दिले. पीडित महिलेच्या घराशेजारी राहणारी तिची बहीण हीने भांडण सोडवण्यास मध्यस्ती केली असता भगवान आणि सनी यांनी दोघा बहिणींना धक्का बुक्की मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्यांच्या अंगावर धावून त्यांना जोरात धक्का देऊन खाली पडले. महिलांचे कपडे फाडले. आरडा ओरडा ऐकून शेजारी जमा होऊ लागल्यावर तिघांनी तेथून पळ काढला. पिडीत महिलेने संध्याकाळी ८ वाजता पोलीस स्टेशनला जाऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस एनसी म्हणजेच अदखलपात्र गुन्हा घेत होते. महिलेच्या घरात घुसून कपडे फाडणे, धक्काबुक्की करणे, मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करणे या प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करा, अशी मागणी लाल बावटा च्या काॅ. अरूणा मुकणे, निर्मला चौधरी व इतर महिलांनी केली. अखेर अरूणा मुकणे यांनी मीरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना फोन वरून संपर्क साधला. आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला. तेव्हा आयुक्तांनी सांगितल्याने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भा.दं.वि.च्या कलम ३५४, ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत रात्री उशिरा १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री दोन वाजेपर्यंत पिडीत महिला व तिचा लहान मुलगा व संघटनेचे इतर कार्यकर्ते पोलीस स्टेशनमधे बसून होते. गुन्हा दाखल जरी झाला असला तरी अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. आरोपी मोकाटच फिरत आहेत. तरी या सर्व आरोपींना तात्काळ अटक नाही झाली तर लाल बावट्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काॅ. अरूणा मुकणे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *