
प्रतिनिधी:
विरार येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ८ वी ते १० इयत्ता करिता शिक्षकच नसल्याची बाब समोर आली असून शिक्षण विभागाचे अधिकारी काय करीत आहेत. त्यांचे लक्ष आहे कुठे? असा प्रश्न पडतो.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालघर जिल्हा अंतर्गत विरार (पूर्व) कुआरी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेला ८ वी ते १० वी वर्गाकरिता वर्ष २०१७-१८ मध्ये मान्यता मिळाली. पहिल्याच वर्षाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. जिल्हा परिषदेने या शाळेला ४ शिक्षक दिले होते. मात्र २०२० मध्ये त्यांची बदली झाली. आता ऑक्टोबर मध्ये शाळा सुरू करण्याचे संकेत मिळाले आहेत. परंतु शिक्षकच नाहीत तर शाळा सुरू होऊन ही मुलांना शिकवणार कोण असा प्रश्न आहे. शिक्षकांच्या समस्येबाबत माजी नगरसेवक रेहमान बलोच यांनी शासन दरबारी सातत्याने पत्रव्यवहार केले. त्यांनी १०० हून अधिक तक्रारी केल्या. मात्र शिक्षण विभागाने अजिबात दखल घेतली नाही याबद्दल रेहमान बलोच यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, असलम शेख, हसन मुश्रीफ, अब्दुल नबी सत्तार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मंत्रालय सचिव, अल्पसंख्याक आयोग सचिव, खासदार, आमदार यांना सातत्याने पत्रव्यवहार केले. मात्र कुठूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. वसई तालुक्यात ११ उर्दू शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असून शासन-प्रशासन याकडे अजिबात लक्ष देत नसल्याची खंत रेहमान बलोच यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद उर्दू शाळेत ३५० हून अधिक विद्यार्थी शिकतात.
शाळेला शिक्षक न दिल्यास विद्यार्थी शाळेच्या बाहेर बसून शासनाचा निषेध करतील, शासनाने लवकरात लवकर विरार (पूर्व) कुआरी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेला ८ वी ते १० वी वर्गाकरिता शिक्षक नियुक्त करावेत, अशी मागणी रेहमान बलोच यांनी केली आहे.