अवैधपणे माती विकणाऱ्या विक्टर रॉड्रीक्स विरोधात कारवाई कधी? तक्रारदार सायोनारा गोन्सालविस यांचा सवाल ?

वसई प्रतिनिधी : भूमाफिया, भ्रष्ट महसूल प्रशासन आणि पोलीस यांच्या अभद्र युतीतून पर्यावरणाचे संवर्धन करणाऱ्या तिवरांची कत्तल करणारे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.वसई पश्चिमेच्या सांडोर येथील शासनाच्या जागेत शासकीय लोगोचा गैरवापर करून,  तिवरांच्या झाडांची कत्तल करुन, तसेच अवैधपणे माती भराव करुन तलाव खोदाई करणार्‍यांवर कायदेशिर कारवाई व्हावी, यासाठी वसईतील एक गायिका लढा देत असून मात्र महसूल आणि पोलीस खाते तिच्या तक्रारीची गांभिर्याने दखल घेत नसल्याने तिवरांच्या झाडांची कत्तल करणारे मोकाट फिरत आहेत. या प्रकरणात एकाला जेमतेम अटक होऊन लगेच जामीनही मिळाला; दुसरा फरार असून तिसऱ्या दोषींवर अद्याप गुन्हाही दाखल करण्यात आलेला नाही.               सामाजिक भावनेतून सांडोर येथील शोना उर्फ सायोनारा गोन्सालवीस या कलावंत असलेल्या युवतीने सनदशीर मार्गाने आपला संघर्ष सुरु ठेवला आहे. मौजे सांडोर येथील सर्व्हे नं. 70 या सरकारी खाजण जमिनी लगत असलेल्या शेत जमिनीत सायोनारा गोन्सालविस शेती करतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही त्या भातशेतीचे पिक घेण्यासाठी गेल्या असता, लगतच्या सरकारी जमिनीवर माती भराव करुन तिवरांच्या झाडाची कत्तल करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या प्रकरणी व्यवस्थित माहिती घेऊन,  तिवरांच्या झाडांची कत्तल करणारे वॉर्नर परेरा आणि रॉबी परेरा यांच्या विरोधात वसईचे प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली. प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांनी तक्रारीची दखल घेऊन तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना जागेचा पंचनामा करुन अहवाल देण्यास सांगितले. त्यानुसार तलाठी दिनेश पाटील यांनी पंचनामा केला, पण त्यात तिवरांच्या कत्तलीतून वॉर्नर परेरा यांचे नाव वगळले.           सायोनारा यांच्या सततच्या पाठपुराव्या नंतर प्रांत अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी तलाठ्या मार्फत पोलीस तक्रार करून गुन्हा दाखल केला आहे. त्या जमिनीत तलाव खोदाई करण्यात आला आहे. तसेच शासनाचा लोगो वापरुन ‘मत्स्य शेतीद्वारे पाणथळ तिवर संवर्धन प्रकल्पा’चा उल्लेख करून दिशाभूल करण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकाचा उल्लेख पंचनाम्यात केला नसल्याने सायोनारा गोन्सालविस यांनी तहसिलदारांकडे तक्रारकरुन पुन्हा पंचनामा करावा, अशी मागणी केली. तहसिलदार यांनी तलाठी यांना पुन्हा पंचनामा करण्यास सांगितल्यानंतर तलाठी पाटील यांनी पुन्हा काही घटनांचा उल्लेख टाळला. सायोनारा यांनी पुन्हा तिसऱ्यांदा तलाठी पाटील यांच्या संशयास्पद भूमिकेसह पंचनामा सदोष असल्याची प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर विक्टर रॉड्रीक्स यांच्या जमिनीतून जवळपास 200 ते 250 ब्रास माती महसूल बुडवून काढली आहे. हा उल्लेख पंचनाम्यात येऊनही मात्र विक्टर यांच्यावर कारवाई झालेली नाही.                तक्रार दाखल होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यावर केवळ रॉबी परेरा यास अलीकडेच या प्रकरणी अटक होऊन, त्यास जामीनही मिळाला आहे. तर मुख्य आरोपी वॉर्नर परेरा हा फरार असून, ज्यांच्या शेतातून सुमारे 250 ब्रास माती रॉयल्टी बुडवून आणण्यात आली. शिवाय एक जेसीबी आणि दोन ट्रॅक्टर माती उत्खनन करताना रेडहॅण्ड पकडले, त्या विक्टर रॉड्रीक्स यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप गोन्सालविस यांनी केला आहे.          संबंधितांवर योग्य ती कडक कारवाई करत नसल्याने मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस अनधिकृत काम करणार्‍यांना पाठिशी घालत आहे.सरकारी जमिनीचा गैरवापर होत असल्याचे व महसूल बुडविला जात असल्याचे,तसेच शासनाच्या लोगोचा गैरवापर होत असल्याचे आणि तिवरांची कत्तल होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही महसूल आणि पोलीस योग्य कारवाई न करता उलट तुम्हाला यात काय इंटरेस्ट आहे? असा प्रश्‍न विचारत असतील तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा?असा प्रश्‍न सायोनारा यांनी आपली कैफियत मांडताना उपस्थित केला आहे . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *