
प्रतिनिधी :
बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल केल्याप्रकरणी विकासक पुरुषोत्तम अनंत कवळी यांच्यावर वसई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीमध्ये गाव मौजे मालोंडे सीटीएस नंबर १०५६/७ या भूखंडावर विकासक पुरुषोत्तम अनंत कवळी यांनी अनधिकृतपणे झाडांची कत्तल केल्याप्रकरणी वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय कार्यालयातील वृक्ष प्राधिकरण लिपिक दिनेश बबल्या जनाथी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सागर शांताराम चव्हाण करीत आहेत.
सदर भूखंडावरील झाडे तोडून विकासक पुरुषोत्तम कवळी यांनी इमारतीच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. सदरच्या बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम परवानगीचे फलक लावण्यात आलेले नाही. मात्र सदर बांधकामाला वसई विरार शहर महानगरपालिका नगर रचना विभागाकडून परवानगी घेतली असल्याचे समजते. झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पुरुषोत्तम कवळी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्यामुळे ज्या भूखंडावरील झाडे तोडण्याचा गुन्हा आहे त्या भूखंडावर दिलेली बांधकाम परवानगी महानगरपालिका नगर रचना विभागाने रद्द करावी.
