
प्रतिनिधी
ठाणे – वसई-विरारमधील शिवसैनिक प्रामाणिक आणि निष्ठावान आहे. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रसंगी तो सदैव शिवसेनेसोबत राहिला आहे. त्यामुळे लहानतल्या लहान शिवसैनिकाला बळ आणि प्रेरणा देण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. त्यांच्यासोबत राहण्याचे काम आम्ही करणार आहोत, अशा शब्दात पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शिवसैनिकांना आश्वस्त केले.
शिवसेना आमदार व पालघर संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान आयोजित ‘दुर्गोत्सवा’ला कृषिमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नुकतीच भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाकेला साद देत आणि नगरविकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘महारक्तदान’ शिबिराचा धागा पकड़त साधलेल्या अनौपचारिक संवादादरम्यान वसई-विरार व पालघर-बोईसर जिल्ह्यातील शिवसैनिकांचे दादाजी भुसे यांनी कौतुक केले.
या रक्तदान शिबिरात वसई-विरार व पालघर-बोईसर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे. शिवसेनेसोबत रक्ताची नाळ असल्याशिवाय हे शक्य नाही, अशी भावना दादाजी भुसे यांनी या वेळी व्यक्त केली.
वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीदरम्यान वेळ प्रसंगी धोरणात्मक निर्णय घेतले जातील. आवश्यक बदल केले जातील. मात्र येणारा काळ कसा आहे, हे पाहून ही रणनीती ठरवली जाईल. विजय मिळवायचा तर रणनीती आखावीच लागते. त्याला जर-तरचे लेबल लावून चालत नाही. माध्यमांनी तसे आडाखे बांधू नयेत, असे म्हणत शिवसेनेची घोड़दौड़ पुढेही वेगाने सुरूच राहील, असे संकेत दिले.
या प्रसंगी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी अन्य विषयांवरही आमदार रविंद्र फाटक, शिवसेना युवा नेता पंकज देशमुख, उपस्थित अन्य मान्यवर व माध्यम प्रतिनिधी यांच्यासोबत मुक्त व मनमोकळा संवाद साधला.
पालघर हाच विकासाचा केंद्रबिंदू!
महाविकास आघाडीच्या विकासाचा केंद्रबिंदू पालघर जिल्हाच आहे. पालघर जिल्हा कार्यालय लोकापर्ण सोहळ्याच्या निमित्ताने याची मुहूर्तमेढ़ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑगस्ट महिन्यात रोवली आहे.
त्यानंतर पालघर जिल्हा विकासाच्या दृष्टीने अनेक धोरणात्मक निर्णय या सरकारने घेतले आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रालयातील आढ़ावा बैठकीतही अनेक कामांबाबत राज्याचा कृषिमंत्री व या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने अनेक सूचना केल्या असल्याचे दादाजी भुसे म्हणाले.
यात डहाणू आणि जव्हार उपकेंद्र प्रकल्पाबाबत वन हद्दीतून जाणा-या अतिउच्च वीज दाब वाहिनीस परवानगी मिळण्यासंदर्भातील कार्यवाही जलद गतीने करण्यात यावी. वसई-विरार मधील चार आणि डहाणूमधील एका गावात वीज वितरणाच्या कामास मंजुरी देऊन, आदिवासी भागात १०० टक्के विद्युत पुरवठा करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करावे. आदिवासीबहुल भागाचा विकास जलदगतीने करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती दादाजी भुसे यांनी या वेळी दिली.