
पालिका आणि पोलिसांची सोईस्कर डोळेझाक
प्रतिनिधी
वसई- राज्य सरकारने हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटला बंधनकारक केलेली नियमावली धुडकावून वसई पश्चिमेकडील गैलेक्सी वैभव हॉटेल सुरुच ठेवण्यात येत असल्याचे उघड़ झाले आहे. सर्व हॉटेल १० वाजता बंद करण्याचे आदेश असताना गैलेक्सी वैभव हॉटेल मात्र त्यानंतरही सुरुच ठेवण्यात येत असून; या हॉटेलची १० वाजल्यानंतरची बिलेच ग्राहकांकडून प्राप्त झाली आहेत.
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील वसई पारनाका येथे गैलेक्सी वैभव हॉटेल आहे. या हॉटेलपासून पालिका कार्यालय १० मिनिटांच्या अंतरावर; तर वसई पोलीस ठाणे अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर आहे.
कोविड-१९ संक्रमण पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले असले तरी; हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट यांना ५० टक्के ग्राहक घेण्याची मुभा देण्यात आली असून; रात्री १० वाजता बंद करण्याचे आदेश आहेत.
मात्र या सगळ्या नियमावली धुडकावून गैलेक्सी वैभव हॉटेल सुरुच ठेवण्यात येत असताना पालिका आणि पोलीस सोईस्कर दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलीस आणि पालिकेविरोधात संताप व्यक्त केला आहे.