नालासोपारा :- वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व प्रभागात गटारावर बसविलेली झाकणे गायब होणे किव्हा तुटणे ही नित्याची बाब झाली असून त्यामुळे नागरिकांच्या जीवावर बेतू शकते.या विषयाबाबत मागील वर्षी बहुतेक प्रभागातील गटारे उघडी असल्याचे फोटो काढून त्याबद्दल बातमी दिल्यानंतर झाकणे बसविण्याची कामे करण्यात आली. यावर्षी देखील अशीच परिस्थिती असून बरीच गटारे पूर्णतः उघडी आहेत पण त्याकडे वसई विरार शहर महानगर पालिकेकडून दुर्लक्ष होत आहे.

पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिक पद पथावरून ये-जा करतात. साचलेल्या पाण्यामुळे उघडी गटारे दिसत नाहीत, त्या कारणाने नागरिक त्यात पडण्याचा धोका असतो. अशा घटना घडून नागरिकांचे नाहक बळी गेले आहेत. त्यामुळे सर्व प्रथम ही उघडी गटारे बंदिस्त करण्याचे काम होणे गरजेचे आहे. दुसरी महत्वाची समस्या म्हणजे पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून प्रवाशांना प्रवास करताना शारिरीक त्रास होतो. ज्येष्ठ नागरिक, महिला यांना दुचाकी किंवा रिक्षातून प्रवास करताना अक्षरशः हाल होतात. त्यामुळे हे काम सुद्धा युद्ध पातळीवर होणे आवश्यक आहे.

शहरातील कचरा रोज उचलला जातो त्याबद्दल प्रश्न नाही परंतु वादळामुळे तसेच जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडतात. त्यांचा कचरा पावसाच्या पाण्यामुळे कुजून नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होतो. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक धास्तावलेले असतानाच कचऱ्याच्या समस्येमुळे रोगराईचे आमंत्रण मिळते आणि आरोग्य विषयक समस्या वाढतात. त्यासाठी कचरा रोजच्या रोज उचलणे अत्यावश्यक आहे. पावसाळ्यात झाडांच्या फांद्या अवास्तव वाढतात. महापालिका हद्दीत महावितरणच्या विजवाहक तारांवर या फांद्या घासत असल्याने शॉर्ट सर्किट होण्याच्या घटना घडून आग लागण्याचा संभव जास्त असतो. त्यामुळे सर्व ठिकाणच्या वाढलेल्या फांद्या छाटणे जरुरीचे आहे.

महापालिकेने बांधलेले तलाव तसेच वसई विरार शहरातील महत्वाची तळी, बावखले यांत झाडांची पाने इतर कचरा पडून पाणी खराब होते, त्यामुळे हे तलाव, तळी, बावखले स्वछ करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात वरील प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे होते. परंतु आता पावसाळा संपत आला असून आगामी येणाऱ्या नवरात्री, दसरा, दिवाळी या सणापूर्वी ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यात यावित म्हणून युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवले असून संबधित विभागांना तसे आदेश देऊन कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *