
वसई (प्रतिनिधी) मुंबई व गुजरातसह इतर भागांना जोडणाऱ्या , वसई पूर्व भागातून गेलेल्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर आय.आर. बी या कंपनीकडून देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे गेल्या 9 महिन्यात 96 अपघात झाले असून 9 जण मॄत्यूमुखी पडले आहेत, तर 64 प्रवासी जखमी झाले आहेत.
महामार्ग देखभालीचे काम पहाणारी आय.आर.बी. या कंपनीच्या दुर्लक्षामुळे सध्या चिंचोटी पोलीस चौकी, वसई फाटा, तुंगार फाटा, उद्दाण पूल, बापाणे पोलीस चौकी, सातिवली फाटा, खानिवडे, ससुनवघर इत्यादी भागात महामार्गावरील काही पथदिवे बंद आहेत. दहिसर ते सुरत मार्गावर वेग मर्यादा दाखवणारे फलक लावलेले नाहीत. या वरदळीच्या महामर्गावर प्राधिकरणातर्फे काही ठिकाणी उदा.खानिवडे, चिंचोटी, बापाणे फाटा, पेल्हार येथे सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) तयार केले आहेत. या सेवा रस्त्यांवर मातीचे ढिगारे तसेच छुप्या मार्गाने कचरा टाकला जात आहे. ठिकठिकाणी चालू असलेली कामे अर्धवट ठेवलेली आहेत. तसेच पेल्हार, शिरसाड, भालीवली, सकवार, ढेकाळे , वरई , सातिवली, दुर्वेश, मस्तान नाका, बोईसर , मेढवण, तवा इ. ठिकाणी दिशादर्शक फलक गंजलेल्या अवस्थेत किंवा धुळीने माखलेले आहेत. अशा अनेक दुर्लक्षित कारणांमुळे व समस्यांमुळे या महामार्गावर विशेषत: रात्री किंवा पहाटेच्या सुमारास काही वाहन चालकांच्या चुकीच्या अपवाद सोडल्यास अपघात झालेले आहेत आणि त्यात निष्पाप प्रवाशांचे बळी जात आहेत.
वसई विरार शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक काही कामानिमित्त पालघर येथे गेले असता वरील बाबी व त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या, त्याबाबत कंपनीस त्यांनी दि.28 – 10 – 21 रोजी पत्र पाठवले आहे.
कोरोना काळात रेल्वे सेवा बंद असल्याने महामार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांची वर्दळ वाढली होती त्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे सुद्धा या अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. घोडबंदर पुलाच्यापुढे ससुनवघर येथील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. महामार्गावरील मार्गदर्शक पट्टे दिसत नाहीत , खड्डयातून वाहने जात असताना अपघाताची शक्यता वाढते वाहतुक कोंडीतर नेहमीच होते. पावसाळ्यायात खड्डयात पाणी साठल्यामुळे खड्डयाची व्याप्ती केवढी आहे हे वाहन चालकांच्या लक्षात येत नाही परिणामी प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागतो व अपघात सुद्धा होतात.
वरील महामार्गावर होणारे अपघात लक्षात घेता अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळण्यासाठी मॄत्यूंजय दूत नेमण्यात आले आहेत. पण महामार्गावर हॉस्पिटल नसल्याने जखमी प्रवाशांना दूरवरच्या हॉस्पिटलमध्ये न्यावे लागते, अत्यवस्थ प्रवाशाचा त्यात अंत होऊ शकतो.
वरील सर्व कारणांमुळे होणाऱ्या अपघातांना नॅशनल हायवे अँथोरिटी व महामार्ग देखभालीचे काम पाहणारी आय.आर बी. ही कंपनी जबाबदार आहे. त्यामुळे वरील सर्व गैरसोयी 15 दिवसात दूर करून व सर्व खड्डे बुजवून हा महामार्ग वाहतुकीच्या दॄष्टीने सुरक्षित करून द्यावा अन्यथा युवक काँग्रेसतर्फे या महामार्गावर आणि प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा वसई विरार जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी इशारा दिला आहे.
