
दि.२८-१० – २०२१ मुंबई ,
मार्च २०२० ला देशात लाँकडाऊन घोषित केल्यानंतर सर्व मेल एक्सप्रेस गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्या नंतर टप्प्या टप्प्याने त्या सुरु करण्यात आल्या परंतू पालघर स्थानकात लाँकडाऊन च्या आधी थांबत असणाऱ्या काही गाड्यांचा पालघर येथिल थांबा अनभिज्ञपणे कोणतेही कारण न देता काढण्यात आला. त्या अनुषंगाने स्वराज एक्सप्रेस, बांद्रा अजमेर एक्सप्रेस, अजमेर मैसूर एक्सप्रेस तसेच इतर राजस्थानच्या दिशेने जाणाऱ्या इतर गाड्यांचे पालघर स्थानकातील थांबे पुर्ववत करावे ह्या साठी मुंबई रेल्वे प्रवासी संघाच्या शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अलोक कंसल ह्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
ह्यावेळी पालघर स्थानकात ह्या गाड्यांना थांबा दिलेला असताना रेल्वेला झालेल्या उत्पन्नाचा लेखाजोखाही महाव्यवस्थापकांना सादर करण्यात आला.
ह्या थांब्यांप्रमाणेच पालघर स्थानकाचा आरक्षणाच्या जनरल कोट्यामधे समाविष्ट करावा ही मागणी देखिल करण्यात आली.
काही दिवसांपुर्वीच डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने देखिल महाव्यवस्थापकांना भेटून ह्या आशयाचे निवेदन दिले होते व आता मुंबई रेल्वे प्रवासी संघाने देखिल ह्या थांब्यांसाठी आग्रह धरला असून त्यायोगे रेल्वे प्रशासनावर थांबे पुर्ववत करण्यासाठी दबाव वाढू लागला आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासन ह्या मागण्यांचा सकारात्मक विचार करुन पालघर स्थानकातील थांबे पुर्ववत करतील अशी आशा मुंबई रेल्वे प्रवासी संघाच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली. ह्या शिष्टमंडळात मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष श्री. मधू कोटीयन, सचिव- पी. वी. आनंदपद्मनाभन आणि सह सचिव- श्री. हृदयनाथ म्हात्रे ह्यांचा समावेश होता.