
कारवाईसाठी शिवसेना विरार उपशहर प्रमुख विनायक भोसले यांचे वाहतूक विभागाला निवेदन
विरार(प्रतिनिधी)-वसई विरार परिसरात कालबाह्य झालेले पाण्याचे टँकर धावत आहेत. या टँकरमुळे रस्त्यांवर अपघातांचे प्रमाणही मोठया प्रमाणात वाढले आहे. नुकतेच चंदनसार,भाटपाडा येथे झालेल्या अश्याच एका अपघातात एकाच कुटुंबातील ३ जणांचा बळी गेला होता. अश्या सतत च्या अपघातांमुळे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.वास्तविक एकीकडे वसई विरार शहरात धावणारे पाण्याचे टँकर यमदूत बनले आहेत.वर्षभरात शेकडो जणांचा बळी या टँकर माफियांनी घेतला आहे.असे असतानाही विरोधात ठोस कारवाई होत नसल्याने हे टँकर माफिया आजही मोकाट असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान नुकतेच रस्त्यांवर धावणाऱ्या कालबाह्य टँकर विरोधात कारवाईची मोहीम प्रस्थावित करण्याची मागणी शिवसेना विरार उपशहर प्रमुख विनायक भोसले यांनी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब करांडे यांची भेट घेऊन केली.यावेळी अश्या कालबाह्य टँकरवर वेळीच कारवाई न झाल्यास भविष्यात नागरिकांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल असें भोसले यांनी करांडे यांना सांगितले.
दरम्यान टँकर माफियांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन करांडे यांनी दिले आहे.
विनायक भोसले यांनी महासागरकडे बोलताना सांगितले की,कालबाह्य टँकर चालवणाऱ्या चालकांकडे कोणत्याही स्वरूपाची कागदपत्रे नसल्याचे अनेक वेळा समोर आले आहे.शिवाय सदरच्या कालबाह्य टँकर मधून विविध सोसायट्यांना वितरीत होणारे पाणी सुध्दा दूषित असते. त्यामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांनाही सामोरे जावे लागत आहे. सदर प्रकारची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्यांवर धावत असलेले कालबाह्य पाण्याच्या टँकर विरोधात कारवाई ची मोहीम प्रस्तावित करावी.व कारवाईत दोषी आढळनारे टँकर जमा करून संबंधित मालकांवर तसेच या टँकर माफियांना अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी भोसले यांनी केली आहे.
टँकर माफियांना राजकीय वरदहस्त-
विशेष म्हणजे रस्त्यांवर दिवसेंदिवस अपघात वाढत असताना वाहतूक विभागालाही राजकीय हस्तक्षेपा मुळे अनेक अडथळे येत असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही टँकरवर कारवाई करताना अनेक राजकीय पुढारी मध्यस्थी करून या टँकर माफियांची पाठराखण करण्याचा प्रयत्न करतात. वास्थवीक राजकीय वरदहस्ता टँकर माफिया लॉबी बिनदिक्कत पणे रस्त्यांवर पाण्याचे टँकर हाकत आहे. विशेष म्हणजे वसई विरार मधील स्थानिक सत्ताधारी पक्षातील काही पदाधिकारी तसेच भाजपचा वसईतील एक वजनदार नेता जनतेच्या जीवाशी खेळत असून या टँकर माफियांना पाठिशी घालत असल्याची माहिती वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दैनिक महासागर ला दिली.


हजारो सोसायट्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून–
वसई विरारची लोकसंख्या सद्या २५ लाखांच्या घरात आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने शहरातील नागरिकांसाठी वसई विरार पालिकेने पाण्याचे नियोजन करणे आवश्यक होते.तसेच येथील पालिकेतील स्थानिक सत्ताधारी पक्ष बहुजन विकास आघाडीने पाण्याचा प्रश्न निकाली काढणे आवश्यक होते. परंतु प्रत्येक निवडणुकीत केवळ आश्वासने देऊन मताचे राजकारण करण्यात धन्यता मानली.अश्या प्रकारे कधी राजकारण तर कधी पालिका अधिकाऱ्यांचा लालफितीचा कारभार यामुळे आजही शेकडो सोसायट्यांना पालिकेकडून पाण्याची जोडणी मिळालेली नाही.त्यामुळे या सोसायट्यांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहवे लागत आहे.
त्यातच वाहतूक विभागाने अशा नियम न पाळणाऱ्या टँकर विरोधात कारवाई सुरू केल्यास हेच टँकर माफिया सोसायट्यांचा पाणीपुरवठा बंद करून वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे या टँकर लॉबी विरोधात उघडपणे विरोध होताना दिसत नाही. परिणामी पाण्याच्या राजकारणात नागरिकांचा नाहक बळी जात आहेत.