मागण्या पुर्ण होत नाहीत तोवर शेकडो कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करणार !

खेळाच्या मैदानावर भुमाफियांचे बेकायदेशीर बांधकाम आणि भुमाफीयांना पाठिंशी घालतात वसई तहसीलदार ?

वसई तालुक्यातील विविध मुलभूत प्रश्नांवर लाल बावटा सातत्याने लोकांना संघटीत करून आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवत आहे. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर देखील आज आदिवासी समाज मुलभूत अधिकारांकपासून वंचित आहेत. आदिवासी पाड्यात पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. राहत्या घराला घरपट्टी आकारणी केली जात नाही. घराखालील जमीन नावी नाही. समाज मंदिर नाही. पिढ्यानपिढ्या पासून शेट सावकारांच्या मालकी जमिनीत राहून आजवर बेठबिगारी करणे, हे आम्ही आता यापुढे सहन करणार नाही.
अशा प्रकारच्या मागण्या घेऊन मागे २७ /९/२०२१ रोजी वसई तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले होते. त्या दरम्यान नायब तहसीलदार प्रदिप मुकणे यांनी लेखी आश्वासन दिले होते. येत्या १५ दिवसांत सर्व मागण्यांवर निर्णय देऊ. आज पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न करता दिलेल्या आश्वासनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मागण्या पूर्ण करणे तर दूरच उलट आमच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याचे कट रचले जात आहेत. आणि त्या जमिनी भूमाफियांच्या घशात घालण्याचे कारस्थान दिवसाढवळ्या सुरू आहे.
गाव मौजे अर्नाळा येथील सर्व्हे नंबर ४५ या गुरुचरण जमिनीवर गेल्या शेकडो वर्षांपासून शाळेच्या मुळाचे सामने भरविले जात होते. दरवर्षी २५ डिसेंबर रोजी नाताळची जत्रा भरते. अनेक क्रिकेटपटूंनी या मैदानावर क्रिकेटचा सराव करून आज त्या खेळाडूंना राज्यस्तरावर गौरवण्यात आले आहे. या मैदानावर जेव्हा जेव्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेव्हा लाल बावट्याने ठामपणे विरोध केला. अनेक वेळा महसुल खात्याकडे कागदी पत्रव्यवहार केला आहे. अर्नाळा ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व मच्छिमार सोसायटीचे चेअरमन यांनी या मैदानात अनधिकृतपणे बांधकाम करून मुलांच्या खेळाचे मैदान नष्ट करण्याच्या कारवाया चालवल्या आहेत. गोरगरीबांकडून पैसे घेऊन मैदानातील जागा विकण्याचा सपाटा महेंद्र पाटील व विजय थाटू ह्या भुमाफियांनी लावला आहे. या भुमाफियांना पाठिशी घालण्याचे काम वसई तहसीलदार करत आहेत. हा सर्व प्रकार तात्काळ थांबवावा आणि केलेले बेकायदेशीर बांधकाम ताबडतोब निष्कासित करावे आणि मुलांच्या खेळांचे मैदानाला संरक्षण द्यावे ही व इतर मागण्या घेऊन येत्या सोमवार दिनांक १ नोव्हेंबर २०२१ रोजी पासून वसई तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून काॅम्रेड अरुणा मुकणे बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत. व त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती काॅम्रेड शेरू वाघ यांनी दिली. येत्या सोमवारी सकाळी ठिक १० वाजता वसई एसटी डेपो येथून हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन लाल बावट्याचे काॅम्रेड शेरू वाघ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *