तर सावधान ; होऊ शकते तपासणी !

नालासोपारा :- घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे शून्य ते 40 युनिटपर्यंत वीजवापराची खात्री करण्यासाठी वीजमीटरची तपासणी मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. काही ग्राहक मीटरमध्ये फेरफार करून वीज वापरली जात असल्याचा संशय असल्याने महावितरणने ही मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे शून्य ते 40 युनिटपर्यंत वीजवापर ज्या ग्राहकांचा असेल तर सावधान कारण त्यांच्या वीज मीटरची तपासणी होऊ शकते.

ग्राहकांचा वीजवापर व महसूलवाढीसंदर्भात घेतलेल्या आढाव्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील हजारो वीजग्राहक दरमहा शून्य ते 40 युनिटपर्यंत विजेचा वापर करीत असल्याचे दिसून आले. हे ग्राहक प्रामुख्याने शहरी, निमशहरी भागातील आहेत. एवढा कमी वीजवापर असल्याने त्याची खात्री करण्यासाठी सर्व परिमंडलामध्ये वीजमीटर तपासणीची विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत हजारो वीजमीटरची तपासणी करण्यात आली आहे. ग्राहकांना प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे अचूक बिल देण्यासाठी मोबाईल ॲपद्वारे मीटर रिडिंग सुरू करण्यात आले आहे. कंत्राटदारांकडून मीटर रिडिंग योग्य प्रकारे होत असल्याची खातरजमा करण्यासाठी दरमहा 2 टक्के रिडिंगचे पर्यवेक्षण करणार आहे. या मोहिमेमुळे वीज ग्राहकांना अचूक वीजबिल देण्यास गती मिळणार आहे. जादा युनिटचे वीजबिल आल्यास वीजग्राहकांकडून तक्रारी येत आहेत. कमी युनिटचे वीजबिल येत असल्यास ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण अत्यल्प आहे. मीटर बदलून दिल्यानंतर वीजबिलात मागील वीजवापराच्या युनिटचे नियमाप्रमाणे समायोजन करण्यात येणार आहे. दोषी आढळलेल्या संबंधीत मीटर रिडिंग एजन्सीविरूद्ध कारवाई महावितरण करणार आहे.

वीज बिलाची थकबाकी न भरल्यास दिवाळी अंधारात…….

तालुक्यात महावितरणने घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषीपंपधारक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. वीजग्राहकांनी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तसेच थकबाकीदारांनो सावधान, वीज बिल न भरल्यास ऐन दिवाळीत अंधारात जाणार आहे. वसई परिमंडलात सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक तसेच औद्योगिक वर्गवारीतील 3 लाख 21 हजार 126 वीजग्राहकांकडे 117 कोटी 7 लाख रुपयांची थकबाकी आहे.

वापराप्रमाणे बिल येणार………

मीटरची गती संथ असणे, मीटर बंद असणे, डिस्प्ले नसणे, योग्य भार नसणे आदी सदोष प्रकार उर्वरित मीटरमध्ये आढळून आले आहेत. हे सर्व मीटर बदलण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रत्यक्ष वापराप्रमाणे वीजबिल देण्यात येत आहे.

वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल………

वसई परिमंडळात महावितरणची वीज मीटर तपासणी, थकबाकी याची मोहीम सुरू आहे. जे ग्राहक विजेची चोरी करून वीज वापरत आहे. त्या विभागातील सहाय्यक अभियंता स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देऊन वीज चोरीचे गुन्हे दाखल करत आहे. मागील काही दिवसांपासून वीज चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वसई मंडळातील वीजग्राहक…….

1) घरगुती – 7 लाख 72 हजार 257

2) औद्योगिक – 26 हजार 241

3) व्यावसायिक – 82 हजार 701

4) कृषी – 5 हजार 266

1) घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे शून्य ते 40 युनिटपर्यंत सुरू असलेल्या वीजवापराची खात्री करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मीटरमध्ये ग्राहकांनी फेरफार केल्याचे आढळल्याने त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात येणार आहे. – विजयसिंग दुभाते (जनसंपर्क अधिकारी, कल्याण, महावितरण)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *