आदिवासी कला संस्कृती परंपरा यांचे जतन करून विकासाचा उद्देश साधला पाहिजे —- पालकमंत्री दादाजी भुसे
पालघर दि. ०३ :- पालघर जिल्ह्याची ओळख जागतिक स्तरावर आदिवासी बांधवामुळे आहे. आदिवासी कला संस्कृती परंपरा यांचे जतन करून विकासाचा उद्देश साधला जाणार आहे. असा विश्वास कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली.
मोखाडा तालुक्यातील सडकवाडी येथे दीपावलीचा प्रारंभ पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आदिवासी बांधवासोबत केला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार राजेंद्र गावित आमदार सुनील भुसारा जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा कृषी अधिक्षक काशिनाथ तरकसे तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आदिवासी बांधवामध्ये दीपावली साजरी करणारे पहिलेच मंत्री पाहिले असल्याची ग्वाही गावकऱ्यांनी दिली.
पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आदिवासी बंधू-भगिनी तसेच लहान मुलांना दीपावली निमित्त भेटवस्तू देऊन त्यांच्यासोबत आदिवासी पद्धतीचे पारंपारिक भोजन घेतले तसेच पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शेतामध्ये जाऊन शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.
पालकमंत्री दादा भुसे यांच्या भेटीदरम्यान आदिवासी बांधवांनी त्यांच्या स्थानिक समस्या मांडल्या या समस्या तात्काळ सोडवण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिले.
पंचायत समिती मोखाडा येथे महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत कोविड-१९ मध्ये मृत्यू झालेल्या कुटुंब प्रमुखांच्या पाल्यांना भेटवस्तू देऊन, शासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.