
शाखाप्रमुख भावेश महाडिक आणि सहकाऱ्यांकडून नालासोपारा-आचोळे परिसरात फराळ वाटप
प्रतिनिधी
विरार- कोविड-१९ संक्रमणाच्या तब्बल दीड वर्षांनंतर यंदा दीपावलीनिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद व प्रकाशाचे आगमन झालेले आहे. मात्र हातावर पोट असलेल्या मजूर व कामगारांच्या आयुष्यात आजही अंधार आहे. अशा कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आनंदमयी ‘दिवाळी पहाट’ आणण्याचा प्रयत्न नालासोपारा-आचोळे गाव शाखा क्रमांक-८३च्या शिवसैनिकांनी केला आहे.
नालासोपारा पूर्व-आचोळे ग़ाव-पाटील आळीत राहणाऱ्या ४० मजूर आणि कामगारांना दीपावलीनिमित्त फराळ वाटप करून या मजुरांच्या चेहऱ्यावर शिवसेनेचे शाखाप्रमुख भावेश महाडिक आणि सहकाऱ्यांनी हास्य फुलवले आहे.
कोविड-१९ संक्रमणामुळे सर्वच घटकांवर उपासमारी ओढवली होती. कित्येकांच्या नोकरी गेल्या होत्या. हातावर पोट असलेल्या मज़ुरांची आणि त्यांच्या कटुंबियांची अबाळ झाली होती. निर्माणाधिन इमारतींचे काम थांबल्याने अनेक बिगारींना आपल्या गावचा रस्ता धरावा लागला होता.
यथावकाश कोविड-१९ संक्रमण कमी झाल्याने निर्बंध शिथिल झाले आहेत. कामाच्या शोधात पुन्हा गरीबांची पावले शहराकडे वळली आहेत. मात्र अद्याप कित्येक नजरा कामाच्या शोधात आहेत.
नालासोपारा पुलाखाली अनेक नाका मजूर सकाळी कामाच्या शोधात उभे असतात. यातील अनेक जण आचोळे गाव आणि पाटील आळी परिसरात झोपड़यांत वस्ती करून राहतात.
दरम्यान; संपूर्ण शहर दिवाळी साजरी करत असताना या गरजू आणि गरीब मजूर, कष्टकऱ्यांच्या आयुष्यातही आनंद पसरावा, त्यांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलावे, याकरता भावेश महाडिक आणि सहकाऱ्यांनी फराळ वाटपाचा हा छोटासा प्रयत्न केला आहे.
माजी नगरसेविका मथुराताई पेडवी, उपविभाग प्रमुख दिनेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली व भारती आणि प्रीती म्हात्रे, पंकज देशमुख यांच्या सहकार्याने झालेल्या या फराळ वाटप प्रसंगी महिला आघाडी शाखा संघटक उज्ज्वला भगत, उपशाखाप्रमुख धनाजी पाटील आणि अन्य युवा सैनिक उपस्थित होते.