
प्रतिनिधी : हरकत घेऊन ही फेरफार मंजूर करणाऱ्या भ्रष्ट मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे यांच्या विरुद्ध कामण येथील समाजसेवक मनोहर किशोरीलाल गुप्ता यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आरंभले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कामण येथील सर्वे नंबर ७/२, ८/३ अ, सर्वे नंबर १४३/११/२, शिलोत्तर सर्वे नंबर २०/१, १९/२ , १८/६ या भूखंडाच्या फेरफार मंजुरीस मनोहर किशोरीलाल गुप्ता यांनी हरकत घेत तलाठी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्र दिली. मात्र अधिकाऱ्यांनी मनोहर किशोरीलाल गुप्ता यांना न जुमानता त्यांच्या हरकती अर्जांना केराची टोपली दाखविली. अधिकाऱ्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून सदरचे फेरफार मंजूर केले असल्याचा आरोप मनोहर किशोरीलाल गुप्ता यांनी केला आहे. वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा करून ही प्रशासन जुमानत नसल्यामुळे अखेर मनोहर किशोरीलाल गुप्ता यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
मनोहर किशोरीलाल गुप्ता यांनी वसईचे मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून सदर प्रकरणी शशिकांत पडवळे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावत सर्व फेरफार हे पूर्णतः कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून केलेले असून त्यात कोणतीही गडबड व भ्रष्टाचार झालेला नसल्याचे शशिकांत पडवळे यांनी युवा शक्ती एक्सप्रेसच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.