
पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली विविध विकासकामांची माहिती
प्रतिनिधी
विरार- पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हे स्वप्न साकारण्याच्या दृष्टिकोणातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेशित केल्यानुसार आजचा वसई व पालघर दौरा असल्याची माहिती पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
वसईतील विकासकामांचा आढावा घेण्याकरता पालकमंत्री दादाजी भुसे दोन दिवसीय वसई-पालघर दौऱ्यावर आहेत. आज वसईतील दौऱ्यात त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला.
त्यानंतर वसई-विरार महापालिकेच्या निर्माणाधिन प्रशासकीय इमारतीत त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
वसई-विरारकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोणातून महत्त्वाच्या असलेल्या पेल्हार आणि आचोळे या पोलीस ठाण्याचे काम या आधीच झाले होते. या पोलीस ठाण्याचे लोकार्पण आज झाल्याची माहिती भुसे यांनी दिली.
पालघर जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची संकल्पना आणि मान्यतेने पोलीस प्रशासनाकरता १३ चारचाकी व ३५ मोटरसायकल देण्याचा निर्णय झाला असून; पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यातील १३ वाहने त्यांना आज देण्यातही आली असल्याची माहिती पालकमंत्री यांनी या वेळी दिली.
कोविड-१९चा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोविड समर्पित रुग्णालयांचे सामान्य रुग्णालयांत रूपांतर करणे, वसई-विरार महापालिकेच्या ज्या मोकळ्या जागा आहेत; त्या जागेवर भविष्यात वसई-विरारकरांकरता एखादा विकास प्रकल्प तयार करणे, पिण्याच्या पाण्याच्या योजना व क्रीड़ा विषयाशी संबंधित काही प्रकल्पाना आपण आज भेटी दिल्याची माहिती भुसे यांनी दिली.
पासपोर्ट कार्यालय वसई-विरार परिसरातच होणार!
पासपोर्ट कार्यालय वसई-विरार परिसरातच व्हावे, अशी सूचना स्थानिक कार्यकर्त्यांनी केली होती. या सूचनेनुसार संबंधित पालिका व महसूल अधिकाऱ्यांना तशी जागा उपलब्ध होते का? तशी जागा उपलब्ध होत असेल तर या ठिकाणीच स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय निर्माण करून त्याला ज्या सोयीसुविधा लागतात; त्या उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश या वेळी दिले असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
आरटीओ कार्यालयाकरता प्रस्ताव देण्याच्या सूचना!
यासोबतच आरटीओ कार्यालय या भागात हवे, अशी एक मोठी मागणी होती. त्या संदर्भात आरटीओ अधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेची आरक्षणे संरक्षित होणार!
वसई-विरार महापालिका कामगारांचे काही मुद्दे होते; खेळाच्या मैदानांसंदर्भातले मुद्दे होते. पालिकेची आरक्षणे आहेत; महसूल विभागाने पालिकेला सुपूर्द केलेले भूखंड असतील; ते संरक्षित करण्याच्या दृष्टिकोणातून त्यांना कुंपण करणे किंवा त्या ठिकाणी प्रस्तावित असलेले विकासकाम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.
देवगिरी प्रकल्प गतिमान होणार!
रेल्वे उड्डाणपूल प्रकल्प असेल किंवा देवगिरीसारखा ३०-३५ एकर जागेतील याआधीचा मोठा प्रकल्प असेल, हे सर्व प्रकल्प गतिमान करण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचेही ते म्हणाले.
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा भवनाबाबत सूचना!
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा भवन, ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व रुग्णालय व्हावे, अशी एक सूचना खासदार राजेंद्र गावित यांनी केली होती. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितील काही विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले होते; या विकासकामांची आम्ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असल्याची माहिती भुसे यांनी दिली.
सर्वधर्मीयांच्या दफ़नभूमी, कब्रस्तानकरता जागा निवड करण्याच्या सूचना!
सर्वधर्मीयांच्या दफ़नभूमी, कब्रस्तान व स्मशानभूमीकरताच्या काही सूचना होत्या. त्याकरता कुणाचाही विरोध होणार नाही, अशा ठिकाणच्या जागांची निवड करून तशी सोय उपलब्ध करून द्या, अशाही सूचना या दौऱ्यादरम्यान करण्यात आल्याचे भुसे म्हणाले.