


वसई : (प्रतिनिधी) : वसई पूर्व पट्टीतील मालजीपाडा गाव हद्दीत खाडीच्या शेजारील जंगलात गावठी हातभट्टी दारूचे अड्डे मोठ्या प्रमाणात आहेत. या अड्ड्यांवर पोलिसांसहित राज्य उत्पादन शुल्क विभागाने मध्यंतरी कारवाई करून हे अड्डे उद्ध्वस्त केले होते. मात्र कारवाया होऊनही येथील गावठी दारूचे अड्डे पुन्हा सुरू झाले आहेत. नुकतेच कोणाला संशय येऊ नये म्हणून चक्क अॅम्बुलन्समधून गावठी दारू विक्रीसाठी बाहेर नेण्यात येत होती. वालीव पोलिसांना मालजीपाडा गाव हद्दीतून बाहेर येणार्या एका अॅम्बुलन्सवर संशय आल्याने पोलिसांनी अॅम्बुलन्सची तपासणी केली असता त्यात 3 रबरी ट्यूब आणि सुमारे 480 लिटर दारू आढळून आली. याप्रकरणी वालीव पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली आहे. सदरची कारवाई मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मालजीपाडा गाव हद्दीतील अपना धाब्यासमोर करण्यात आली. तसेच पोलिसांनी पांर्या रंगाची अॅम्बुलन्स (क्र.एमएच 04 एफ के 1886) जप्त केली आहे. प्रेमनारायण रामधनी मौर्या (वय 35 वर्ष) रा: सुनिल चाळ, गोवंदनगर, शांतीनगर, ता.भिवंडी, जि.ठाणे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 65 (इ)(अ) सह मोटारवाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाख करण्यात आला आहे.