पालघर, दि. 1- राज्यात 2016 ते 2019 या कालावधीत 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा शासनाने संकल्प केला आहे. त्याअंतर्गत यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून पालघर जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचा शुभारंभ सोमवारी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते जव्हार तालुक्यातील जयसागर डॅम परिसरात करण्यात आला. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबरोबरच त्या वृक्षांचे संवर्धन योग्य रितीने होईल याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास जव्हारचे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, स्थानिक लोकप्रतिनिधी, सहायक जिल्हाधिकारी अजित कुंभार, डहाणूचे उपवनसंरक्षक विजय भिसे, जव्हारचे उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे, तहसिलदार श्री.शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर आदींसह गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर्टस् आणि कॉमर्स कॉलेज, कृष्णा विद्यालय, अनवरे रजा मदरसा येथील विद्यार्थी आणि नागरीक उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वड, पिंपळ आदी पाच हजार उंच रोपांची लागवड करण्यात आली. सदर वृक्षांना रक्षाधागा बांधण्यात येऊन त्यांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्यात आली. जव्हार वन विभागात एकूण 10 लाख सीड बॉल तयार करण्यात आले असून त्यापैकी एक हजार सीड बॉलचे वाटप प्रातिनिधीक स्वरूपात उपस्थित विद्यार्थ्यांना करण्यात आले.
राष्ट्रीय वननीतीनुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के भूभाग वृक्षाच्छादीत असणे आवश्यक आहे. वृक्षाच्छादन वाढल्यास पर्यावरणाच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत होईल हे लक्षात घेऊन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने 50 कोटी वृक्ष लागवडीचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत पालघर जिल्ह्यात 2016 साली 9.20 लक्ष रोपे, 2017 साली 21.62 लक्ष रोपे आणि 2018 साली 50.25 लक्ष रोपांची लागवड करण्यात आली. आजमितीस पालघर जिल्ह्यातील जिवंत रोपांची टक्केवारी अनुक्रमे 80.31 टक्के, 92.14 टक्के आणि 92.70 टक्के इतकी आहे.
पालघर जिल्ह्यात चालू वर्षासाठी वन विभाग आणि इतर शासकीय यंत्रणा आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी मिळून एकूण 79.26 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने 1 जुलै ते 3 सप्टेंबर या कालावधीत प्रत्यक्ष 79.64 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *