प्रवासी व रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे निर्देश

प्रतिनिधी

विरार- कोरोना काळातील वाढीव रिक्षा दर भाडे रद्द करून पूर्वीप्रमाणे तीन प्रवाशी बसवून टप्प्यानुसार जसे भाडे पूर्वी घेतले जात होते; त्याप्रमाणे प्रति प्रवाशी मागे भाडे रिक्षा चालकांनी घ्यावे, असे निर्देश वसई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिले आहेत.

वसई-विरारमधील रिक्षाचालकांनी केलेल्या मनमानी भाडेवाढीविरोधात वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रिक्षावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वसई यांच्या दालनात सोमवारी सायंकाळी प्रवासी व रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत पूर्वीप्रमाणे तीन प्रवाशी बसवून टप्प्यानुसार जसे भाडे पूर्वी घेतले जात होते; त्याप्रमाणे प्रति प्रवाशी मागे भाडे रिक्षा चालकांनी घ्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या यशस्वी तोड़ग्यामुळे हे बहिष्कार आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

परिणामी विरार स्टेशन ते मनवेलपाडा तीन प्रवासी बसवून प्रति प्रवासी दहा रुपये घ्यावे, असा निर्णय झाला आहे. तसेच चौथ्या सीटवर प्रवाशांनी बसू नये, असे आवाहन प्रवाशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवाशी वर्गास करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

रिक्षा चालकांकडून वारंवार आवाहन करण्यात येत असतानाही प्रवाशी स्वइच्छेने रिक्षाचालकाच्या कड़ेला बसत असल्याचे अनेक रिक्षा चालकांकडून सांगण्यात येते. चौथ्या सीटवर बसू नये, असे सांगितल्यास रिक्षा चालक आणि प्रवाशी यांच्यात अनेकदा वाद होतात, ही बाब रिक्षाचालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन अधिकाऱ्यांच्या बैठकीत निदर्शनास आणली.

एखादा रिक्षा चालक प्रवाशासोबत दादागिरी करून निश्चित दरापेक्षा जास्त भाड़े वसूल करत असेल तर संबंधित वाहतूक शाखा, स्थानिक पोलीस ठाणे व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वसई अथवा रिक्षा संघटना प्रतिनिधी यांच्याकडे तक्रार नोंदवावी, असे रिक्षा संघटनेकडून सांगण्यात आले.

या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, वाहतूक पोलीस निरीक्षक परिमंडळ-२ वसईचे शेखर डोंबे, वाहतूक पोलीस निरीक्षक परिमंडळ-३ विरारचे दादाराम कारंडे, प्रवासी संघटना सेक्रेटरी यशवंत जडयार, उपाध्यक्ष अनिल मोरे, ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघ पालघरचे अध्यक्ष विजय खेतले, मधुसूदन राणे, शरद जलगावकर, महेश कदम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *