नालासोपारा :- दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचा ‘ओमिक्रॉन’ हा नवीन प्रकार आढळून आला आहे. सध्यस्थितीत संपूर्ण जगभरात ओमिक्रॉनचे 110 रुग्ण आढळून आलेले असून हा व्हायरस कोव्हीडच्या डेल्टा व्हायरसपेक्षा 500% अधिक संसर्गजन्य असून या व्हायरसची उत्परिवर्तन शक्ती ही डेल्टा व्हायरसपेक्षा अधिक आहे. दक्षिण आफ्रिका, बोट्सवाना, नेदरलँन्ड, हॉंगकॉंग, बेल्जियम, इस्त्राईल, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. तरी याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, सर्व पात्र नागरिकांनी (18 वर्षावरील) स्वत:चे व कुटुंबियांचे कोव्हीड- 19 लसीकरण (पहिला व दुसरा डोस) लवकरात लवकर करून घ्यावे. तसेच सर्वांनी मास्कचा वापर करावा, दोन व्यक्तींमध्ये 6 फुटांपर्यंत अंतर ठेवावे, वारंवार स्वच्छ हात धुवावेत व अनावश्यक घराबाहेर पडू नये.

सध्यस्थितीत महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत सर्व्हेक्षण सुरु असून आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत असून त्यांना अलगीकरणामध्ये ठेवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळतील त्यांची चाचणी करण्यात येईल. तरी नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास संपर्क करावा.

तसेच सिनेमागृह, लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम यांमध्ये सभागृहाच्या क्षमतेच्या 50% उपस्थिती असावी. तसेच खेळाचे मैदान, स्टेडीयम येथे क्षमतेच्या 25% उपस्थिती असावी. सर्व सार्वजनिक ठिकाणी उदा. दुकाने, आस्थापना येथे मास्कचा वापर न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *