
वसई। प्रतिनिधीःवसई विरार शहर महानगरपालिका परिवहन विभागातर्फे मनपा क्षेत्रात अनेक ठिकाणी बस सेवा सुरू असुन, परिवहन सेवेतील नियोजनातील अभावा मुळे असंख्य प्रवाशांना बस ऐवजी रिक्षा अथवा इतर वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने, सोय असुनही अधिक पैशाचा भुर्दंड सहन करावा लागतो आहे.त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.त्यांच्या मते रिक्षा चालकांच्या सोयी साठी,वाहक आणि चालक मनमानीपणे सदरच्या मोकळ्या रस्त्यावर बस पळवित असावेत असे स्थानिक नागरिकांत बोले जाते आहे.
या संदर्भात समोर आलेली वस्तुस्थिती अशी की,वसई पश्चिम तहसिलदार येथील बस स्टॉप वरून वसई रोड स्टेशन कडे जाणाऱ्या बस क्रमांक ११२ व ३०६ या वास्तविक तहसीलदार कार्यालय येथून पारनाका मार्गे पुढे बस स्टॅन्ड आणि वसई स्टेशन रोड या मार्गावर धावणे आवश्यक आहे.
तथापि त्या तशा न धावता, तहसीलदार कार्यालय समोरील पुर्वेच्या रस्त्यावरुन सरळ बस स्टँड आणि तिथून पुढे वसई रोड स्टेशन अशा पळविल्या जातात.ज्यामुळे तहसिलदार कार्यालय ते पारनाका या दरम्यानच्या प्रवाशांना विनाकारण रिक्षा अथवा इतर वाहनांचा वापर करावा लागतो व त्यासाठी अधिकचा भुर्दंड भरावा लागतो आहे.व त्याचा परिणाम मनपाच्या महसुलावर होत असल्याने याचा गांभीर्याने विचार, प्रवाशांच्या सोयीच्या ठरणाऱ्या मार्गावरून बस धावत्या ठेवल्याजाणे अनिवार्य आहे.