सरकारची भ्रष्टाचाराची आणखी काही प्रकरणे आणली समोर…

अंतिम आठवड्यावर बोलताना जयंतराव पाटील यांनी सरकारवर साधला निशाणा…

मुंबई दि. १ जुलै – तुमची ताकद महाराष्ट्रात असेल किंवा तुमच्यात हिंमत असेल तर येणारी विधानसभा निवडणुक बॅलेट पेपरवर घ्यावी, तसा ठराव करा… दुध का दुध…पानी का पानी होवून जाईल असे जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आणि प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

विधानसभेत अंतिम आठवडा चर्चेत बोलताना जयंतराव पाटील यांनी सरकारच्या महसुल, नगरविकास खात्यातील आणखी काही भ्रष्टाचार कागदपत्रांसह सभागृहात मांडला.

सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले मात्र त्यांच्यावरील कारवाईचा चौकशी अहवाल अद्याप सभागृहात आला नाही. हा मुद्दा सांगतानाच मुख्यमंत्री सभागृहात राजकीय अभिनिवेश करतात व मुद्दा सोडून देतात. नुसता शो या सरकारचा सुरु आहे. सरकार जाहिरातीवर खर्च जास्त आणि काम कमी असल्याचा आरोपही जयंतराव पाटील यांनी केला.

मीराभाईंदर नगरपालिका हद्दीतील सेव्हन इलेव्हन हॉटेलच्या मालकाने कांदळवनात सीआरझेडचे उल्लंघन करत शिवाय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे प्रकरण सभागृहासमोर आणले.

पर्यावरणाचा ऱ्हास करायचा नाही असे असताना सरकारने या हॉटेलला बांधकाम करण्यास परवानगी दिली. मात्र त्याठिकाणी संबंधित हॉटेल मालकाने क्लब बांधला आहे. सुरुवातीला मीराभाईंदर नपाने परवानगी दिली मात्र तक्रार आल्यावर परवानगी रद्द केली. मात्र नगरविकास खात्याने स्टेट हायवे जात असल्याचे दाखवत या हॉटेलला परवानगी दिली. परंतु मालकाने क्लब बांधला. या परवानगी पत्रावर स्वतः मुख्यमंत्र्यांची सही असल्याची गंभीर बाब जयंतराव पाटील यांनी समोर आणली.

कांदळवन नष्ट केले म्हणून ६ गुन्हे संबंधितांवर दाखल करण्यात आले आहेत परंतु त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल जयंतराव पाटील यांनी केला.

भाजपाचे नेते नरेंद्र मेहता यांच्या बंधुंचे हे हॉटेल आहे. मीराभाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांची कुणासोबत पार्टनरशिप आहे याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे आणि कशापध्दतीने काम केले जात आहे व त्याला कुणाचा आशिर्वाद आहे असेही जयंतराव पाटील म्हणाले.

राज्य सरकारने अलीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार केला आणि काही लोकांना त्यात वगळले. प्रकाश मेहता यांनाही वगळले. चोरीचा माल सापडला म्हणजे काही चोराला सोडता येत नाही. त्यामुळे मेहतांना घरी पाठवून काही होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी लोकायुक्ताचा अहवाल दडवून ठेवला. भ्रष्टाचार झाला हे शेंबडे पोरगं पण सांगू शकते त्यामुळे प्रकाश मेहतांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी जयंतराव पाटील यांनी केली.

दर्शन डेव्हलपर्स या कंपनीने सत्ताधारी पक्षाला फंड दिला आहे. ही कंपनी काहीच प्रगती करत नव्हती मात्र त्यांनी सत्ताधारी पक्षाला मोठा फंड दिला. एसआरए प्रकल्पात या कंपनीने प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. या कंपनीने चार कंपन्या स्थापन केल्या आणि २ हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळवले. पण या कंपनीने कोणतेही प्रोजेक्ट सुरू केले नाही. त्याच कंपनीला मेहतांनी मदत केली याचीही चौकशी व्हायला हवी अशीही मागणी जयंतराव पाटील यांनी केली.

असाच एक प्रकार अंधेरीतल्या आशिष एन्टरप्रायजेस, परीणी एन्टरप्रायजेस या विकासकांनी केला आहे. या कंपन्यांनी मुद्रांक शुल्कच भरले नाही आणि सरकारचे ८० कोटी रुपयांचे नुकसान केले. सरकार हे नुकसान का सहन करत आहे याची चौकशी झाली पाहिजे असेही जयंतराव पाटील म्हणाले.

शिवडी येथील अभ्यूदय गृहनिर्माण संस्थेतही भ्रष्टाचार झाला आहे. रुस्तमजीसह अन्य तीन कंपन्यांनी सरकारचा ५११ कोटीचा कॉर्पस फंड बुडवला. सरकारचे ८१ कोटी रुपये बुडवले. रुस्तमजी सरकारचा जावई आहे की काय ? असा सवाल करतानाच रुस्तमजी नाव आले की सर्वच त्यांच्यासमोर पायघड्या घालतात असा टोला सरकारला लगावला.

धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स याआधी राज्याच्या क्रिडा विभागाकडून चालवले जायचे मात्र या सरकारच्या काळात ते बिल्डरांना आंदण दिले आहे. सध्या ऑस्कर बिल्डरला हे काम दिले गेले आहे. ५ लाख रुपये मेंबरशिप घेतली जात आहे. या कंपनीचे मालक सुरज सावंत कोण आहेत ? सरकार यांच्यावर इतके मेहरबान का आहे? असा सवालही सरकारला केला.

परवती पुणे या भागातील एका जमिनीसंदर्भात अतिशय गंभीर घटना घडली आहे. दिनकर कुलकर्णी या खोट्या नावावर मंगेश कुलकर्णी याचे खोटे मृत्युपत्र दाखल करून दत्तात्रय गिरी यांच्या नावे जमीन करण्यात आली. मात्र मंगेश कुलकर्णी यांचा जामखेड येथे संशयास्पद मृत्यू झाला. याची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही जयंतराव पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *