प्रतिनिधी

विरार- वसई-विरार महपालिकेत आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत असलेले निलेश जाधव यांना या पदावर दिलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील नियुक्तिचा कालावधी उलटून गेलेला असतानाही या पदावर त्यांची नियुक्ती कायम असल्याने वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख यांनी आक्षेप नोंदवला आहे.

वसई-विरारमधील जनतेकरता महत्त्वाच्या असलेल्या आरोग्य (स्वच्छता) विभागाचा कारभार सफाई कर्मचारी आणि त्या खात्याचे ज्ञान नसलेल्या कामगारांच्या हाती सोपवून आयुक्त गंगाथरन डी. यांनी आपण याबाबत अजिबात गंभीर नसल्याचे दाखवले आहे, अशी टीका शेख यांनी केली आहे.

२५ लाख वसई-विरारकरांचे आरोग्य पालिकेच्या स्वच्छता विभागावर अवलंबून आहे. मात्र या विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी मनाली शिंदे या भ्रष्टाचारी; तर आरोग्य निरीक्षक पदी निलेश जाधव यांची नियुक्ति करून आयुक्तांनी अकलेचे दिवाळे तोडले आहेत, अशी टीका तसनीफ शेख यांनी केली आहे.

निलेश जाधव तत्कालीन वसई नगरपरिषदेत सफाई कर्मचारी होते. संचालक, नगर परिषद संचालनालयाच्या आदेश क्रमांक- नपप्रस २००६/१/१टीएच/१ प्रलंबित पदनी/प्र.क्र.१७४/२००६ दि. १४/२/२००६ अन्वये वसई नगरपरिषदेच्या नवीन कर्मचारी आकृती बंधानुसार मंजूर असलेल्या ‘स्वच्छता निरीक्षक’ या पदावर वसई नगर परिषदेतील सफाई कर्मचारी सफाई कामगार निलेश जाधव यांना सेवा ज्येष्ठता व किमान पात्रताधारक करत असलेले एक वर्षाचे कालावधीसाठी ही नियुक्ति देण्यात आली होती. ही नियुक्ति तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेली असताना आजही निलेश जाधव या पदावर कार्यरत असल्याचे शेख यांनी निदर्शनास आणले आहे.

तर वसई नगरपालिकेत लसटोचक म्हणून रुजू झालेले विकास पाटील यांचीही आरोग्य खात्यात प्रोबेशन पीरियडवर तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आलेली नेमणुक व अन्य कर्मचारी यांचीही नेमणुक अद्याप कायम असल्याने तसनीफ शेख यांनी आक्षेप नोंदवला आहे.

दरम्यान; या संदर्भात तसनीफ़ नूर शेख यांनी आयुक्त गंगाथरन ड़ी. यांना पत्रव्यवहार करून या नियुक्ति तातडीने रद्दबातल करण्याची मागणी केली आहे. शिवाय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याही आयुक्तांनी केलेली हलगर्जी निदर्शनास आणली आहे.


सेवानिवृत्त उपअधिक्षक प्रेमसिंग जाधव यांची नियुक्ति वादाच्या भोवऱ्यात!

आयुक्तपदानंतर प्रशासक म्हणून अधिकार मिळाल्यानंतर वसई-विरार महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक
गंगाथरन डी. यांनी ऑक्टोबर महिन्यात
निवडणुकीचे कामकाज व जनगणनेच्या कामाकरता सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर सेवानिवृत्त उपअधिक्षक प्रेमसिंग जाधव यांची सर्व नियम धाब्यावर बसवून केलेली नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

वसई-विरार महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यात होईल अशी शक्यता आहे. त्याकामासाठी महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्याची सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करायची होती. ही निवड प्रक्रियाच आता आयुक्तांच्या निर्णयामुळे वादात सापडली आहे. महानगरपालिका अधिनियम कलम ५३ (३) मधील
तरतुदींचा भंग करून ही नियुक्ती करण्यात आल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच वसई-विरार महापालिकेच्या
आस्थापनेवरून उपअधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या प्रेमसिंग जाधव यांची आयुक्तांनी नियुक्ती केलेली आहे.

कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करताना गट क आणि गट ड संवर्गातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने ८ जानेवारी २०१६ आणि २ मार्च २०१६ रोजी काढलेल्या आदेशात दिलेले आहेत.

त्याचाच भंग जाधव यांची नियुक्ती करताना झाल्याचे दिसून आले आहे. करार पद्धतीवर नेमणुका करताना पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. त्यासाठी जाहिरात देऊन पात्र सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात यावेत. आलेल्या अर्जातील पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी, असेही स्पष्ट आदेश असताना जाधव यांची नियुक्ती करताना या आदेशाचीही पायमल्ली करण्यात आली असल्याचे वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ नूर शेख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *