
आज शुक्रवार दिनांक १७/१२/२०२१ रोजी आंबेडकरी चळवळिच्या व समविचारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधान कृती समितीच्या माध्यमातून विरार पूर्व मनवेलपाडा येथिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिक्रमा व उद्यान परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व विद्यार्थी अभ्यासिकेसाठी स्वतंत्र इमारत वस्तू उभारण्यात यावी अशा मागणीचे पत्र वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त डी. गंगाधरन यांची भेट घेऊन देण्यात आले. सदर भेटी वेळी बहुजन पँथर पक्षाचे अध्यक्ष ऍड. किर्तीराज लोखंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पालघर जिल्हा अध्यक्ष गिरीश दिवाणजी, काँग्रेस विरार अध्यक्ष नितीन उबाळे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, बहुजन पँथर विरार शहर अध्यक्ष मनोज जाधव, समाजसेवक अविनाश कापसे, बहुजन पँथर युवा उपाध्यक्ष सचिन मोहिते, समाजसेविका अंजना देवकांत, रिपाइं विरार अध्यक्ष अमर साळवे व इतरहि पदाधिकारी उपस्थित होते.
आयुक्तांच्या भेटी दरम्यान दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, तत्कालीन विरार नगर परिषदेच्या काळात मनवेलपाडा येथील तलावाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिक्रमा तलाव व उद्यान असे नामकरण करण्यात आले आहे. या नामकरणानंतर अनेक आंबेडकरी तथा संविधानवादी विचारांच्या विविध राजकीय व सामाजिक संघटना यांची प्रामुख्याने मागणी होती की , सदर परिसरात तलावाच्या मधोमध भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून उद्यान परिसरातील काही मोकळ्या भागात त्यांच्या विचारांना साजेसे अशी वाचनालय व विद्यार्थी अभ्यासिकेची स्वतंत्र इमारत वास्तू निर्माण व्हावी. या मागणी संदर्भात अनेकवेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असता सदर मागणीबाबत लोकप्रतिनिधी व तत्कालीन प्रशासनाची उदासीनता जाणवत होती. या विषयाकडे आयुक्त यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन संबंधित मागणीला न्याय देऊन विरार शहरात सुंदर अशी समानतावादी विचारसरणीची प्रतीक असणारी वास्तू इतर महानगरपालिकेप्रमाणे आपल्याही वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माध्यमांतुन निर्माण व्हावी अशी विनंती करण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात या मागणी करीता आंदोलनाच्या भूमिकेत विरार मधील आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरू शकते असा इशाराही संविधान कृती समिती च्या माध्यमातून देण्यात आला आहे.

