
सुमारे अडीच लाखांचे मासे जप्त,फौजदारी गुन्हे दाखल होणार !


पालघर (प्रतिनिधी) – अखेर मत्स्यव्यवसाय विभागाने बेकायदा पर्ससीन बोटींवर आपला फास आणखीन घट्ट केला आहे. डहाणूच्या समुद्री मासेमारी क्षेत्रात दहा नॉटिकल अंतरावर पालघर मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने धाड टाकून बेकायदा मासेमारी करत असलेल्या केंद्रशासित प्रदेशातील पर्ससीन ट्रॉलरला ताब्यात घेतले व त्यावर कारवाई केली.
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये म्हणजेच 12 नॉटिकल अंतरामध्ये पर्ससीन नौका एलईडी द्वारे केली जाणारी मासेमारी यांना निषिद्ध क्षेत्र आहे. या नौका गेल्या अनेक महिन्यांपासून पालघरच्या समोरील समुद्रात धुडगूस घालत आहेत. अनेक वेळा मच्छिमारांनी या संदर्भात मत्स्यव्यवसाय विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. दोन-तीन महिन्यांपूर्वी मत्स्यव्यवसाय विभागाने अशा एका पर्ससीन ट्रॉलर वर कारवाई करून त्यातील मत्स्य साठा लिलाव केला होता. त्यानंतरही या ट्रोलरचा धुमाकूळ सुरू होता. गुजरात सह विविध राज्यातील व इतर जिल्ह्यातील या बेकायदा ट्रॉलर्स पालघर जिल्ह्याच्या मासेमारी क्षेत्रात शिरून येथील मासेमारी ओरबाडून नेत असल्याचे मच्छिमारांनी अनेक वेळा आक्रोश व्यक्त केला आहे. अनेक वेळा स्थानिक मच्छीमार व पर्ससीन ट्रॉलर यांचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
डहाणूच्या समुद्रात केंद्रशासित प्रदेशातील दीव दमण येथील एक बेकायदा पर्ससीन ट्रॉलर्स समुद्रात येणार असल्याची गुप्त माहिती मत्सव्यवसाय विभागाला मिळाली. मत्स्यव्यवसाय विभागाने ही ट्रॉलर येणार असल्या ठिकाणी जाऊन पाळत ठेवली व अखेर ती ट्रॉलर्स आली व मत्स्यव्यवसाय विभागाने मासेमारी करत असलेल्या ट्रोलर वर छापा मारून ती आपल्या ताब्यात घेतली. डहाणू समोरील समुद्रात पर्ससीन जाळे द्वारे मासेमारी केलेले सुमारे 2 लाख 30 हजार रुपये किमतीचे मासे व ट्रॉलर्स वरील कामगार मत्स्यव्यवसाय विभागाने ताब्यात घेतले. जप्त केलेल्या मत्स्य साठ्याचा लिलाव करून ट्रॉलर्स वर किमतीच्या पाचपट दंड आकारला जाणार आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाकडे गस्ती नौकांची कमतरता असल्याने स्पीड बोटी यांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित असताना मत्स्यव्यवसाय विभागाने केलेली कारवाई कौतुकास्पद असल्याचे मच्छीमारांना मार्फत सांगितले जात आहे. लवकरच मत्स्यव्यवसाय विभागाला स्पीड बोटी प्राप्त होतील असे अलीकडेच मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी म्हटले आहे.
पर्ससीन ट्रॉलर्स बंदी या नव्या कायद्यान्वये ट्रॉलर्स वर कारवाई केली जाणार असून ताब्यात घेतलेल्या कामगारांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल.
आनंद पालव, सह मत्स्यव्यवसाय आयुक्त,ठाणे-पालघर