
नालासोपारा :- वसईच्या वालीव येथील इंडस्ट्रियल संकुलातील वीस गाळ्यांचे विद्युत जोडणीचे इंस्पेक्शन करुन ते योग्य असल्याचे फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी 90 हजारांची खंडणी मागून तडजोड अंती 84 हजार रुपये मागणाऱ्या महावितरणच्या लाचखोर शाखा अभियंत्यासह एका खाजगी आरोपीला ठाण्याच्या अँटी करप्शन ब्युरोच्या पोलिसांनी रंगेहात बुधवारी पकडले आहे. या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ माजली आहे.
पालघरच्या उद्योग , उर्जा व कामगार विभागाच्या वर्ग 2 चे शाखा अभियंता राजु नातराव गिते (57) यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून 45 वर्षीय तक्रारदाराला त्यांनी बांधलेल्या गाळ्याचे व सदर इंडस्ट्रियल संकुलातील इतर गाळ्यांचे विद्युत जोडणीचे इंस्पेक्शन करुन ते योग्य असल्याचे फिटनेस सर्टिफिकेट देण्याकरीता एकूण 20 गाळ्यांचे (प्रत्येक गाळ्याचे साडे चार हजार रुपये याप्रमाणे) एकूण 90 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. पण यात काही तडजोड करून 84 हजार रुपये घेण्याचे मान्य केले. याबाबत ठाण्याच्या अँटी करप्शन ब्युरोच्या पोलिसांना संपर्क साधून माहिती देण्यात आली होती. बुधवारी तक्रारदार आणि राजु नातराव गिते (57), खाजगी इसम सागर तानाजी गोरड (29) असे सदर इंडस्ट्रियल संकुलात आले. व गीते हे खाली थांबून त्यांनी यातील खाजगी आरोपीला त्यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारण्यास पाठविले. त्याने लाचेची रक्कम स्विकारुन ती स्वीकारले बाबत लोकसेवक गीते यांना फोन द्वारे कळविले. त्यावेळी लोकसेवक गीते हे तक्रारदार यांचे कार्यालयात येत असताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. वालीव पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा खंडणीचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.