
सुरक्षा रक्षकाला योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यावर स्थानिक पोलीस ठाण्यातून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळेल
नालासोपारा :- मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत जे विनापरवाना सिक्युरिटी एजन्सी चालवतात अशा चालक व मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच सिक्युरिटी एजन्सीच्या परवान्याकरिता पैशाची मागणी होत असल्यास माहिती द्यावी, त्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच सुरक्षा रक्षकाला योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास स्थानिक पोलीस ठाण्यातून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळेल, अशी माहिती झोन दोनचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी लोकमतला दिली आहे. वसईतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या घरी एक वर्षांपासून काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने मित्रांच्या मदतीने त्यांच्या घरात लाखोंची घरफोडी केली होती. पण वसई पोलिसांच्या उत्कृष्टपणे तपासामुळे आरोपींना अटक करून गुन्ह्याचा उलगडा झाला होता. दरम्यान या धक्कादायक प्रकारामुळे वसई विरार परिसरात तसेच गजबजलेल्या विभागात इमारती, पतपेढया, एटीएम, ज्वेलर्स या ठिकाणी पुरवण्यात येणाऱ्या खाजगी सुरक्षा कंपन्यांच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरातील कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याकरीता नागरिकांची जागरुकता आणि सहकार्याची अपेक्षा त्यावर त्यांनी भर दिला तसेच सर्व कामकाज गतिमान करण्यासाठी ऑनलाईन सुविधा असणार आहे. शहरात कोठेही काहीही झाल्यास स्थानिक मोबाईलवर कॉल करून किंवा व्हॉट्सअप नंबरवर माहिती देण्याचे आवाहन केले आहे. खाजगी सुरक्षा रक्षक हे गृहनिर्माण हौसिंग सोसायटी, मॉल, हॉटेल अँड रेस्टोरंट-पब, सर्व प्रकारची दुकाने, आय टी कंपनी, खाजगी बंगले, बँक, एटीएम, सर्व प्रकारची ऑफिस, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, उद्याने, सार्वजनिक पे अँड पार्क पार्किंग, कमर्शियल कॉम्प्लेक्स, ज्वेलरी शॉप, बिग बाजार, डी मार्ट, सिनेमा गृह, शासकीय निमशासकीय संस्था, सरकारी कार्यालय, कारखाने, औद्योगिक वसाहत, विविध बाजारपेठ इ. ठिकाणी काम करतात. त्यांनी पोलिसांचे खासदूत म्हणून काम केल्यास मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यांवर आळा बसू शकतो आणि जे गुन्हे घडले त्यांच्या तपासाला चालना मिळू शकते. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरक्षा रक्षक यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहे. जेणेकरुन पोलीस ठाण्यातील हद्दीतील सुरक्षा एजन्सी व सुरक्षा रक्षक या व्हॉट्सअप ग्रुपला जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
बऱ्याच सुरक्षा एजन्सीकड़े जेष्ठ नागरिकांना सुरक्षा रक्षक म्हणून कामाला ठेवल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. कमी पगार देवून अशा जेष्ठ नागरिकांना एटीएम, ज्वेलर्स अशा जोखमीच्या ठिकाणी ठेवून महत्वाच्या ठिकानाची सुरक्षा अगदी वाऱ्यावर सोडण्याचे काम काही खाजगी सुरक्षा एजन्सी करतात. काही ठिकाणी सुरक्षा रक्षकांकडे शस्त्रे असतात. पण ही शस्त्रे चालवण्याचा परवाना आहे का ? योग्य प्रक्षिक्षण दिले आहे का ? शस्त्र बाळगण्याची शारीरिक आणि मानसिक योग्यता आहे का ? असे अनेक प्रश्न पडल्यामुळे व् अनेक मुद्यांवर आता बेकायदेशीर खाजगी सुरक्षा एजन्सीचा सुळसुळाट सुरु असल्याचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.