विसाव्या शतकातील सामाजिक सुधारणेच्या कार्यात तसेच आंदोलनात ज्या महापुरुषांचा उल्लेखनिय व महत्वपूर्ण सहभाग होता, त्यात लोकसंत, कर्मयोगी, वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल.

दीनदलित, पीडित, वंचित आणि दुःखीतांच्या कल्याणासाठी या दोन्ही बाबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यासाठी त्यांनी प्रबोधन केले, गरजेनुसार लढे दिले, कालानुरूप आंदोलने केलीत. बळकट असलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढणे आणि सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख ध्येय आणि उद्दिष्ट होते. कीर्तन हे गाडगे बाबाच्या जन प्रबोधनाचे प्रमुख माध्यम, तर डॉ.आंबेडकर यांनी सामाजिक, राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून हे कार्य आरंभले होते. त्यांच्या कार्याची दिशा आणि ध्येय समान होते.

संत गाडगेबाबा हे डॉ.आंबेडकर यांच्या समकालीन; परंतु पंधरा वर्षे वयाने मोठे असले तरी अन्य राजकीय व्यक्ती व समाज सुधारकांपेक्षा डॉ.आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने-कार्याने ते अत्याधिक प्रभावित होते. अनिष्ट प्रथा, जुन्या रूढी, प्रथा, परंपरा आणि अंधश्रद्धा नष्ट करणे हे दोन्ही बाबांच्या कार्याच्या समान सूत्राने समाज आजही प्रभावित होतो. त्यांच्यात एकमेकांप्रती प्रचंड आदर, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, सार्थ अभिमान, सामंजस्य, समन्वय आणि प्रचंड आत्मीयता होती.

उच्चशिक्षित आंबेडकर सामाजिक सुधारणा व अन्य महत्वपूर्ण कार्याच्या बाबतीत गाडगे बाबांबरोबर सल्लामसलत करीत, तर गाडगेबाबा किर्तन प्रसंगी आंबेडकरांच्या चिंतन, मनन, मंथन आणि त्यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख करीत असत.

किर्तन हे गाडगेबाबांच्या जनप्रबोधनाचे प्रमुख माध्यम. बाबांचे मुंबईत कीर्तन असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संधी मिळेल तेव्हा आवर्जून किर्तन ऐकायला जात असत आणि इतरांनाही प्रेरित करीत असत…आग्रह करीत असत. बाबासाहेबांचा हा आग्रह ज्ञानात्मक होता, मनोरंजनात्मक नाही.

एकदा मुंबईच्या भायखळा मार्केटमध्ये बाबांचे कीर्तन होते. वि.मा.दि पटवर्धन आपल्या आठवणीत सांगतात की, डॉ.आंबेडकरांच्या आग्रहाखातर एकदा त्यांच्याबरोबर विविध वृत्तपत्राचे संपादक आणि मी बाबांच्या किर्तनाला गेलो. भायखळा मार्केट जे नेहमी घाणेरडं असायचं ते आज लख्ख होत.

“सालं या म्युन्सीपालटीच्या लोकांना कीर्तनाची पटांगण साफ करायला बर सुचतं… नाही तर के.ई. एम.चं आवार बघा कधी त्याला झाडू लागेल तर शपथ.”

रामभाऊ आपल्या स्वभावानुरूप चरफडले आणि रुमाल टाकून त्यावर बसणार तोच बाबासाहेबांनी तो रुमाल ओढून घेतला आणि म्हणाले

“अरे ए रामभाऊ, हे मार्केट बाबांनी स्वतःच्या हातानी झाडून, धुऊन काढलं, बस नीट आरामात.”

बाबांच्या कीर्तनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर खालीच बसायचे आणि म्हणायचे,

“जेथे जेथे गाडगेबाबा तेथे तेथे घाण असूच शकत नाही.”

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी खाली जमिनीवर बसत. विशेष म्हणजे ते खाली जमिनीवर बसून कीर्तन ऐकत असत. कीर्तन सुरू होताच तटणीस नावाच्या एका श्रोत्यांनी त्यांना विचारले,

“महाराज एक ईचारू का?

त्यावर गाडगेबाबा म्हणाले,

“ईचारा मायबाप, पण मले महाराज म्हणू नका, मी आपले लेकरू हाय. बोलविते धनीच बसले तुमच्या पलीकडे. तेच आहे खरे महाराज. गरीब लोकांसाठी, आपल्या समाजासाठी लढणारे महाराज तुमच्यासाठी आधीच जमिनीवर बसून माय कीर्तन आईकून राहिले”

असे म्हणून त्यांनी बाबासाहेबांकडे अंगुलीनिर्देश केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चक्क जमिनीवर बसून कीर्तन ऐकत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्वत्तापूर्ण व्यक्तिमत्व आणि कर्तुत्वाने गाडगेबाबा अत्याधिक प्रभावित झाले होते.आंबेडकरांप्रती त्यांना प्रचंड आदर, आत्मीयता होती. त्यांना कुठेही बाबासाहेबांविषयी अनादर दिसल्यास ते अस्वस्थ होत असत. म्हणून ते कीर्तनातून बाबासाहेबांचा जीवनप्रवास, संघर्ष, शैक्षणिक व इतर कार्य लोकांसमोर मांडत. त्यांचा जयघोष करीत असत.

असाच १९४२ चा एक प्रसंग. मनमाड येथे तात्यासाहेब पवार यांच्या बंगल्यासमोर आयोजित कीर्तनाच्या वेळी अन्य महापुरुषांच्या कार्याबरोबरच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची महती त्यांनी लोकांसमोर मांडली. कीर्तनाच्या अंतिम टप्प्यात बाबा म्हणाले,
“बोलो डॉ.बाबासाहेब आंबेडकर की” असा जयघोष केला. मात्र श्रोत्यांकडून कसलाच पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी बाबा अस्वस्थ झाले. बाबा पुन्हा बाबासाहेबांचे कार्य, संघर्ष आणि त्यांच्या कार्याची महती अत्यंत पोटतिडकीने सांगू लागले. बाबांच्या तळमळीने संपूर्ण जनसमुदाय प्रभावित झाला होता. तद्नंतर बाबा पुन्हा जयघोष देत म्हणाले,

“डॉ.बाबासाहेब आंबेडकर की”

लोक म्हणू लागले,

“जय” “जय”

जनसमुदायातून झालेला हा प्रचंड जयघोष गगनाला भेदत होता. यावरून गाडगे बाबांना आंबेडकरांप्रती किती आदर व आत्मीयता आणि सामाजिक कार्याची जाणीव होती हे त्यांच्या तळमळीतून प्रकर्षाने दिसून येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे बाबा यांच्यामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे सख्य होते. बाबासाहेबांच्या विदवत्तेने गाडगेबाबांचे मन भारावून जाई. तर गाडगेबाबांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाने बाबासाहेब प्रभावित होत असे. दोन्ही बाबांचे कार्य हे एकमेकांना परस्पर पूरक असेच होते. दोघांनीही समाज परिवर्तनासाठी आणि वंचितांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले. परिवर्तनाच्या लढाईतून दोघांनाही घट्ट ऋणानुबंधात बांधले. संधी मिळेल तेव्हा ते एकमेकांना भेटत असत.

गाडगेबाबांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्चविद्याविभूषित होते. असे असतानाही शिक्षणाची दरी त्यांच्या घट्ट नात्यात कधीच आड आली नाही. उलट उत्तरोत्तर हे ऋणानुबंध अधिक घट्ट होत गेले. म्हणूनच बाबा कीर्तनातून शिक्षणावर अधिक भर देत असताना डॉ.आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्याचे दाखले देत असत.

आपल्या अखेरच्या कीर्तनात गाडगेबाबा म्हणाले होते,

“विद्या केवढी मोठी गोष्ट आहे. डॉ.आंबेडकर साहेब यांच्या पिढ्यान पिढीनं झाडू मारायचं काम केलं, यांच्या वडीलाले सुबुद्धी सुचली आणि डॉ. आंबेडकर साहेबाले शाळेत घातलं. आंबेडकर साहेबांनी काही लहानसान कमाई नाही केली. त्यांनी घटना केली. हिंदुस्तानची घटना केली. घटना….. अन तेच शाळेत जाते ना, अन शिकते ना, तर झाडू मारनच त्यांच्या कर्मात होत. विद्या मोठ धन आहे. जेवणाचं ताट मोडा. बायकोला लुगडं कमी भावाचा घ्या. मोडक्या घरात राहा. पण मुलाले शिक्षण दिल्याविने सोडू नोका!”

असे बाबा डॉ. आंबेडकरांचा गौरव करून त्यांचा आदर्श समाजापुढे ठेवून शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत.

भारतीय चातुर्वर्ण व्यवस्था अत्यंत प्रबळ होती. प्रस्थापितांनी अस्पृश्य व दलितांना त्यांचे हक्कच नाकारले होते. इतरांप्रमाणे दलित, वंचित, अस्पृश्य समाजाला सुद्धा अधिकार व हक्क मिळावेत यासाठी डॉ.आंबेडकर आग्रही होते. त्यासाठी त्यांनी आंदोलने केली. लढे उभारले. हेच कार्य गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून केले आहे. दोघांच्या कार्याचा समान धागा होता.

प्रस्थापितांनी नाकारलेल्या समाजाला न्यायासाठी अखेर डॉ.आंबेडकरांनी १९३५ ला येवले येथे हिंदू धर्म त्यागाची घोषणा केली. तेव्हा अन्य धर्माचे लोक डॉ.आंबेडकरांना त्यांचाच धर्म स्वीकारण्यासाठी विनंती करीत होते. दरम्यानच्या काळात डॉ.आंबेडकर गाडगे बाबांच्या भेटीस आवर्जून गेले. त्यांच्याशी सल्ला-मसलत केली. बाबासाहेब गाडगे बाबांना म्हणाले,

“बाबा आपण माझे गुरु आहात एका बाबतीत मला आपला सल्ला पाहिजे.”

बाबा म्हणाले,

“बोला मले अडाण्याले काय उमगत! समजत!”

त्यावेळी डॉ.आंबेडकरांनी गाडगे बाबांजवळ हिंदू धर्म त्यागाचा आणि नवा धर्म स्वीकारण्याचा मनोदय व्यक्त केला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले,

“मले काय धर्माचे ज्ञान? मी अडाणी धोबी!”

बाबासाहेब सांगत होते. बाबा ऐकत होते. स्तब्ध होते. पण थोड्यावेळाने म्हणाले,

“डॉ.साहेब मी अडाणी माणूस! तुम्ही शिकले-सवरले हायेत! लय बुक वाचली हायेत. तुम्हाले आपल्या समाजाची दुक दैना माहित आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल तो बेसच असंन. सगळी पददलित जमात तुमच्या मागे आहे. तुम्ही रस्ता दावान त्या रस्त्याने ते सगळे येतील…त्येची तुमच्या वर श्रद्धा आहे. तुमच्या एका अक्षरापायी हे लोक जीव टाकतील.भलत्या वाटेने नेऊ नका ! बुध्द आणि त्याचा धरम माणुसकीचा धरम हाये.आम्ही बाप्पा त्याच धर्माचे वारकरी आहोत. हाच धर्म माणुसकीने अन साऱ्या समाजाला पुढे नेईन.तुम्ही करान ते बरुबर आसन. सारा समाज तुमच्या पाठीशी हाये.”

यावरून गाडगेबाबांचे विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी किती मिळते जुळते होते हे लक्षात येते. दोघांच्याही सल्ला-मसलत करण्याच्या प्रक्रियेत कुठलीच औपचारिकता आणि कुठलाच पूर्वग्रह नव्हता. परस्परांविषयी आत्मीयता प्रेम व सहकार्य होते. दोघेही मानवतावादाचे पाईक! एक उच्चविद्याविभूषित तर दुसरे निरक्षर पण दोघांच्याही कार्याची गती व दिशा जवळपास समान होती.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारत सरकारमध्ये मंत्री असतानासुद्धा बाबांची भेट घेण्यास कधी विसरत नसत. १४ जुलै १९५१ ची गोष्ट…. बाबांची प्रकृती ठीक नव्हती. ते मुंबईतच दादर येथील एका दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले होते. ही माहिती महानंद स्वामी यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कळाली होती. डॉ.आंबेडकर त्यावेळी कायदामंत्री होते. त्याच दिवशी सायंकाळी त्यांना दिल्लीला परतणे आवश्यक होते. त्यासाठी ते बॉम्बे सेंट्रल रेल्वे स्टेशनवर पोहोचले सुद्धा होते. परंतु बाबांच्या प्रकृतीची बातमी कळताच त्यांनी सर्व कार्यक्रम बाजूला सारून गाडगे बाबांच्या भेटीसाठी थेट दवाखान्यात पोहोचले. त्यावेळी त्यांनी सोबत बाबांसाठी दोन घोंगड्या खरेदी केल्या होत्या. बाबा कुणाकडून काहीच स्वीकारत नसंत, पण बाबासाहेबांनी आणलेल्या घोंगड्या मात्र त्यांनी स्वीकारल्या. गाडगे बाबा तेव्हा म्हणाले,

“डॉ.साहेब तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे.”

तितक्याच तन्मयतेने डॉ. आंबेडकर म्हणाले,

“बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे.”

याप्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यातून सुखद अश्रू तरळले होते. कदाचित हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत असावे. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील हे सुद्धा उपस्थित होते. बाबासाहेबांनी गाडगे बाबांना तब्येतीला जपा, धर्मशाळा व अन्य कामाची चिंता करू नका, ते केव्हाही पुढे करता येईल.आपण आज विश्रांती घ्या. याच भेटीदरम्यान गाडगे बाबांनी डॉ.आंबेडकरांना पंढरपुरातील चोखामेळा धर्मशाळा पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या शैक्षणिक कामासाठी दिली. तसेच पंढरपूर धर्मशाळेचे दानपत्र आणि धर्मशाळेच्या खात्यात जमा असलेली एकूण रक्कम १५,०००/ डॉ.आंबेडकरांकडे सुपूर्द केली होती. या बाबतीत त्यांचा हा स्नेह अतूट होता. गाडगे बाबा डॉ. आंबेडकरांना म्हणाले की,

“आपली लई आधीच भेट झाली असती, तर धर्मशाळा काढण्याच्या ऐवजी शिक्षण शाळा काढल्या असत्या. पण आता हे काम तुम्हीच करा, समाजाले अशा लय स्कूलची, कॉलीजाची गरज आहे.”

या भेटीदरम्यानचा संवाद दोघांच्याही दुर्दम्य इच्छाशक्तीचा आणि परस्परांची समाजाप्रतीची असलेली आस्था, तळमळ प्रकर्षाने दाखविणारा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे कार्य तितक्याच पोटतिडकीने पुढे रेटले. त्यानुषंगाने गाडगेबाबांची शिक्षणा प्रतीची स्वप्नपूर्तता यानिमित्ताने झाली आहे.

स्वतःचा मुलगा गोविंदा आणि जन्मदात्री आई यांच्या मृत्यूचा परिणाम इतका झाला नाही तितका परिणाम डॉ.आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाचा झाला. ६ डिसेंबर १९५६ ला बाबासाहेब आंबेडकरांचे ‘महापरिनिर्वाण’ झाले. ही बातमी बाबांच्या कानी पडली, तेव्हा गाडगे बाबा धायमोकलून रडले. गाडगे बाबा का रडतात हे उपस्थितांना उमगलेच नाही. तेव्हा बाबा आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले,

“अरे तुमचा आमचा बाप आज या जगात नाही राहिला. अरे तुम्ही आम्ही पोरके झालो रे”

असे म्हणत दुःखांना वाट मोकळी करून दिली.

‘असे किती गेले कोट्यानु कोटी काय रडू एकल्यासाठी’ असे म्हणणारे गाडगे बाबा डॉ.आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर अवघ्या १४ दिवसांनी म्हणजेच २० डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले.

अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य, अनिष्ट प्रथा मोडीत काढण्यासाठी जीवन खर्ची घातलेले तसेच गावोगावी फिरून दिवसाच्या वेळी गावाची स्वच्छता आणि रात्रीच्या वेळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मने स्वच्छ करणाऱ्या गाडगेबाबांचा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन एकाच महिन्यात येतो.

आज गाडगे बाबा यांची ६५ वी पुण्यतिथी! त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *