ग्राहकांच्या हक्कासाठी जनजागृतीपर कार्यक्रम

ग्राहकांनी आपल्या हक्काचा प्रती जागरूक राहून प्रबोधनातून हक्क मिळवणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी पालघरच्या तहसीलदार कार्यालयात केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त पुरवठा विभाग व तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ग्राहक संरक्षण कायदा जागरुक करणे याअंतर्गत ग्राहकांना त्यांच्या सहा हक्काची जाणीव करून देणे यासाठी तहसीलदार कार्यालयात अनेक ग्राहक वर्गाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या विविध विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुरक्षा हक्क, माहितीचा हक्क, माहिती हक्क निवड, आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार, ग्राहकांच्या तक्रारी व त्यांचे निरसन, ग्राहकांच्या शिक्षणाचा अधिकार यासाठी कायद्याअंतर्गत ग्राहकांना प्रदान करण्यात आलेल्या विविध हक्कांविषयी जनजागृती व माहितीपर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त पालघर तालुक्यातील विविध शाळांमधून ग्राहक हक्कांविषयी चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याचे तालुका पुरवठा अधिकारी शामली धपाडे यांनी माहिती दिली.

ग्राहकांनी आपले हक्क जाणून घेऊन हक्काचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढण यांनी सांगितले.तर असे जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन ग्राहकांना त्यांचे हक्क व त्या संदर्भातील माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त असल्याचे नगराध्यक्ष डॉ. उज्वला काळे यांनी सांगितले. कार्यक्रमामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासह पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे चव्हाण, वैधमापन निरीक्षक भालेराव तसेच राष्ट्रीय ग्राहक संरक्षण फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *