
शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
तृतीयपंथीयांना लाभ मिळावा याकरिता वैभव संखे यांच्याकडून पाठपुरावा
आपल्या समाजाचाच भाग असलेल्या तृतीयपंथी यांना आज २१ व्या शतकातही उपेक्षेचे, अवहेलनेचेच जगणे जगावे लागत आहे. तृतीयपंथी हे समाजाचाच भाग असताना आजही ते आपल्या मुलभूत हक्कापासून वंचित आहेत. मात्र आता शासकिय योजनांमुळे तृतीयपथीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढान यांनी व्यक्त केले.
बोईसर येथिल मंडळ अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सहाय्य योजना शिबिरात त्या बोलत होत्या. तृतीयपंथीयांना शासकिय योजनांचा लाभ मिळावा याकरिता वैभव संखे यांच्याकडून सतत पाठपुरावा सुरू होता. या शिबिरात बोईसर मधील 35 तृतीयपंथीयांना संजय गांधी योजनेच अंतर्गत लाभ मिळणार आहे. याकरिता आवश्यक कागदपत्र महसूल विभागाच्या व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शहानिशा करून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.त्यामुळे आपली ओळख सांगताना त्यांना केवळ नाव पुरेसं ठरत नाही तर सोबत जात, धर्म, उत्पन्न आदी विविध दाखले काढणे सोपे होणार आहे.
येत्या जानेवारीच्या १ तारखेपासून ते ३१ तारखेपर्यंत वंचीत व दुर्बल घटकांसाठी विशेष सहाय्य योजना गावोगावी राबविण्यात येणार आहे. याची प्रथम सुरुवात आज तृतीय पंथीयांपासून केली आहे.संजय गांधी निराधार योजने अंतर्गत दरमहा १ हजार रुपयांचे आथिर्क सहाय्य त्यांना या योजनेअंतर्गत मिळणार आहे. तसेच अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त, निराधार १८ वर्षाखालील अनाथ मुले, निराधार विधवा, घटस्पोटीत स्रीया, देवदासी, अत्याचारित महिला, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आदींकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अशा योजनांचा सहभाग आहे. त्याकरिता गावपातळीवरील ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच या सर्वांना आपल्याकडील लाभार्थींना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी बोईसर मंडळ अधिकारी मनिष वर्तक यांनी केले.
समाजात मानाने जगणं हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. परंतु, आज इतक्या वर्षांनंतरही समाजाकडून तृतीयपंथीयांना स्वीकारण्यात आलेलं नाही.शहरी आणि ग्रामीण भागातील तृतीय पंथीयांच्या समस्या आणि संघर्ष वेगळा आहे. मात्र आज आम्हाला आमचे हक्क देण्यासाठी आपण सर्व पुढे आल्याबद्दल तृतीय पंथीयांच्या आरती यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदही वाढान, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे, बोईसर मंडळ अधिकारी मनिष वर्तक, जिल्हा वैद्यकीय चिकित्सक राजेंद्र केलकर, डॉ. मनोज शिंदे, तलाठी हितेश राऊत, उज्वला पाटील, सोपान पवार, रत्नदीप दळवी, अनंता पाटील, साधना चव्हाण आणि लाभार्थी मोठया संखेने उपस्थित होते.
: