
परफ्यूम कंपनीच्या अग्निकांडातील आरोपींना वाचण्यासाठी ‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्याची धडपड
वसई(प्रतिनिधी)-लाच प्रकरणात अटक करण्यात आलेले वसईचे मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे व तलाठी सजा ससूनवघर चे तलाठी विकास करे-पाटील यांचे आणखी काही प्रताप समोर येऊ लागले आहेत.लाच लुचपत विभागाने २१ डिसेंबर रोजी केलेल्या कारवाई आधी ३ दिवस अगोदर या दोन्ही अधिकाऱ्यांनी १८ डिसेंबर रोजी तलाठी सजा कामण हद्दीतील एका परफ्यूम कंपनीला लागलेल्या आगी संदर्भात वसई तहसीलदारांना सादर केलेला पंचनामा व जाबजबाब अहवाल वादात सापडला आहे.हा पंचनामा बनविताना शशिकांत पडवळे व विकास करे-पाटील यांनी परफ्यूम कंपनीच्या मालकांशी आर्थिक हितसंबंध जोपासून बनविला असल्याची चर्चा वसईत रंगू लागली आहे. विशेष म्हणजे या आगीस कारणीभूत असलेले परफ्यूम कंपनीचे मालक अजयकुमार शिंह व प्रवीण शहा यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्याऐवजी त्यानां नुकसान भरपाई (९९,५०,०००) मिळवून देण्यासाठी शिफारस केली आहे.त्यामुळे शशिकांत पडवळे व विकास करे-पाटील यांच्या कार्यपद्धती वर अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
गुरुवार दि १६ डिसेंबर २०२१ रोजी पोमण ग्रामपंचायत हद्दीतील शाष्टीकर पाडा परिसरात एका परफ्यूम कंपनीला आग लागली होती. या आगीत ६ ते ७ कामगार जखमी झाले होते तर परफ्यूम कंपनीच्या ८ गोडावून सह आजूबाजूला असलेली १२ घरे जळून खाक झाली होती.या अग्निकांडा नंतर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या परफ्यूम कंपनीच्या मालकांनी कोणत्याही सक्षम प्राधिकरणाच्या रितसर परवानग्या न घेतल्याची बाब समोर आली होती.याबाबत अनेक वृत्तपत्रां मध्ये वृत्तही प्रसिद्ध झाले आहे.विशेष म्हणजे अनधिकृत पणे गाळे उभारून त्यात आपली परफ्यूम कंपनी अजयकुमार शिंह व प्रवीण शहा यांनी थाटली होती.शिवाय ज्या जागेवर कंपनी उभारली होती मौजे पोमण सर्व्हे नं १७२ ही नं १ ही जागा रमेश घाटाळ नामक या स्थानिक आदिवासी बांधवाच्या
कब्जावहीवाटीची अजून ते या जागेत शेती व शेतीपूरक व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करतात.रमेश घाटाळ यांनी सदर जागेची भुअभिलेख कार्यालय वसई मार्फत जमीन मोजणी केली अजून मोजणी नकाशात आगीच्या भस्मसात झालेली परफ्यूम कंपनी ५ गुंठे जागेत अतिक्रमण करून उभारल्याचे स्पष्ट दिसत आहे.नागेंद्र शिंह नामक परप्रांतीय व्यक्तीने हे अतिक्रमण करून ग्रामपंचायत प्रशासना कडून कोणतीही परवानगी न घेता त्या ठिकाणी आमच्या ५ गुंठे जागेत बेकायदेशीर गाळे उभारले होते.तसेच सदरच्या गळ्यांची अजयकुमार शिंह व प्रवीण शहा यांना विक्री केली होती.विशेष म्हणजे रमेश घाटाळ यांच्या जागेच्या लगत सर्व्हे नं १६९ ही ३ ही जागा आहे. या जागेची कागदपत्रे जोडून रमेश घाटाळ यांच्या जागेत बांधलेल्या गळ्यांना पोमण ग्रामपंचायत कार्यालयाकडून अजयकुमार शिंह व प्रवीण शहा यांच्या नावाने घर क्र.२७२३ व घर क्र २७२४ या क्रमांकांच्या घरपट्ट्या लावून घेतल्या होत्या.या घरपट्ट्या लावताना संबंधितांनी रमेश घाटाळ यांच्या जागेची कागदपत्रे सादर करून ग्रामपंचायत प्रशासनाचीही दिशाभूल केलेली आहे. तसेच त्या जागेत बेकायदेशीर पणे परफ्यूम कंपनी चालू करून परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला होता.
या परफ्यूम कंपनीच्या अतिक्रमणाबाबत जमीन मालक रमेश घाटाळ यांनी संबंधित विभागाकडे तक्रार ही केली होती. दरम्यान या अतिक्रमणाला ग्रामपंचायत कार्यालयाने २६ नोव्हेंबर २०२१ रोजी नोटीस जारी करुन कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु या नोटीशी ला परफ्यूम कंपनी चे मालक अजयकुमार शिंह व प्रवीण शहा यांनी केराची टोपली दाखवत आजपर्यंत कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत.त्यातच १६ डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत लगतच्या १२ घरांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे या आगीच्या घटनेची सखोल चौकशी होणे अपेक्षित होते.परंतु नुकतेच लाचलुचपत विभागाच्या कारवाईत अटक करण्यात आलेले मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे व ससुनवघर तलाठी सजाचे तलाठी विलास करे-पाटील यांनी आगीच्या घटनेची कोणतीही शहानिशा न करता तसेच बाधित स्थानिक आदिवासी जमीन मालकाचा जबाब न नोंदवता परफ्यूम कंपनीच्या मालकांना वाचविण्यासाठी वसई तहसीलदार कार्यालयाकडे सादर करून अजयकुमार शिंह व प्रवीण शहा यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. शिवाय पंचनामा सादर करताना या आगीत बाधित १२ घरांच्या नुकसानीचा तपशील सादर केलेला नाही. विशेष म्हणजे अजयकुमार शिंह व प्रवीण शहा यांच्या हलगर्जीपणा मुळे ही आग लागली होती. शिवाय भरवस्तीत सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून ही परफ्यूम कंपनी थाटली होती.त्यामुळे तहसीलदार कार्यालयाकडे सादर केलेल्या पंचनाम्यानुसार परफ्यूम मालकांना नुकसान भरपाई न देता भुअभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यां समक्ष सुधारित पंचनामा सादर करण्याचे आदेश पारित करावेत तसेच या आगीस कारणीभूत असलेले अजयकुमार शिंह व प्रवीण शहा यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई प्रस्थावित करावी.शिवाय या आगीत बाधित १२ घरांची नुकसानभरपाई वसूल करून घेण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात आली आहे.