

भाजपचे वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांची मागणी
विरार(प्रतिनिधी)-वसई विरार महापालिका क्षेत्र हा बेकायदा बांधकामांचा बालेकिल्ला ठरत आहे, त्यामुळे पालिका नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयानेही नऊ हजार बेकायदा इमारतींबाबत नाराजी व्यक्त केली होती. बेकायदा बांधकामांवर कारवाई होत नसल्यामुळे एका तक्रारदाराने महापालिकेच्या तत्कालीन सहआयुक्तांचे स्टिंग ऑपरेशन केले होते, त्यात संखे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करत बेकायदा बांधकामासाठी मोठी रक्कम वरिष्ठांना दिली जात असल्याचे सांगितले होते. आणि वरिष्ठांच्या आशीर्वादाने सर्व बेकायदा बांधकामे होत असल्याचे ही सांगितलं होत.या स्टिंग ऑपरेशनमुळे महापालिकेची चांगलीच बदनामी झालेल्या या आरोपात किती तथ्य आहे, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी भाजपचे वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून केली होती. मात्र या संदर्भात वारंवार विचारणा केली असता, पालिकेने चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत होता. जेव्हा अधिकाऱ्यावर असे आरोप होतात तेव्हा दोन्ही अधिकाऱ्यांना रजेवर पाठवायला हवे होते आणि तपास पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कारवाई आणि निर्दोषांना कामावर हजर राहण्याचे आदेश देणे हे अपेक्षीत होत. मात्र या प्रकरणात असे काहीही होताना दिसत न्हवते. त्यामुळे या तपासाबाबत खासदार राजेंद्र गावित यांनी २९ नोव्हेंबर रोजी बोलावलेल्या बैठकीत मनोज बारोट यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर ८ डिसेंबरनंतर तत्कालीन सहआयुक्त मोहन संखे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती विविध माध्यमांतून पुढे येत होती.कुठेतरी हा तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडत आहे, त्यामुळे बारोट यांनी १० डिसेंबर रोजी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून तत्कालीन सहआयुक्त मोहन संखे यांना निलंबित करण्याचे कारण स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून त्यांना निलंबित का करण्यात आले आहे हे कळू शकेल असे मत बरोट यांनी व्यक्त केले.
दुसरीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे मोहन संखे यांना निलंबित करण्यात आले असेल तर त्या प्रकरणात संखे हे दोषी असल्याचा पुरावा म्हणजेच तपास अहवाल सार्वजनिक करण्यात यावा जेणेकरून या तपासाबाबत सर्वांच्या मनात निर्माण होत असलेल्या शंकांना उजाळा मिळेल आणि आयुक्तांचा आदरही राखला जाईल. अन्यथा अनेकदा मोठा मासा लहान माशांना गिळतो ही म्हण या प्रकरणामुळे सिद्ध होईल.असे मध्यमांशी बोलताना सांगितले.