
आठवड्याभरात तब्बल 164 पोलिसांना लागण
नालासोपारा :- मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते हे शनिवारी कोरोनाबाधित झाले आहे. त्यांनी स्वतःला घरीच होम क्वांरंटाईन केले असून उपचार घेत आहे. तर पोलीस आयुक्तालयात तिसऱ्या लाटेत अवघ्या आठवड्याभरात तब्बल 44 पोलीस अधिकारी आणि 120 पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांना कोरोना होवून गेला आणि ज्यांचे लसीचे दोन्ही डोस झालेत अशा पोलिसांनाही परत कोरोनाची लागण झाली आहे.
शनिवारी सकाळी पोलीस आयुक्तालयाची सर्व प्रभारी, वरिष्ठ अधिकारी यांची क्राईम मिटिंग होती. त्या मिटिंगला पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते यांच्यासह सर्व प्रभारी वरिष्ठ अधिकारी हजर होते. मिटिंग सुरू असताना अचानक दुपारी आयुक्तांना काही त्रास झाल्याने ते निघून गेले. त्यांनतर त्यांनी कोरोनाची चाचणी केल्यावर ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी स्वतःला घरीच होम क्वारंटाईन केले आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली असल्याचे सूत्रांकडून कळते. पोलीस आयुक्तालयातील मिरा रोड येथे 2, मिरा रोड येथे 6, तुळींज येथे 5, विरार येथे 8, काशिमिरा येथे 28, नयानगर येथे 23, भाईंदर येथे 12, वालीव येथे 13, पेल्हार येथे 2, माणिकपूर येथे 2, नालासोपारा येथे 9, नवघर येथे 15, अर्नाळा येथे 2, उत्तन येथे 2, वसई येथे 2, गुन्हे युनिट दोन 4, अनैतिक शाखा 5, वाहतूक विभाग 3, मध्यवर्ती गुन्हे शाखा 1, सुरक्षा शाखा 1, आरसीपी पथक 6, पोलीस आयुक्त चालक 1, लिपिक 1, नियंत्रण कक्ष 1, होमीसाईड 1, विशेष शाखा 3, सहा पो आयुक्त गुन्हे 1, बिनतारी कक्ष 1 आणि वाचक गुन्हे 2 असे एकूण 44 पोलीस अधिकारी आणि 120 पोलीस अंमलदार यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना लसीकरणाची माहिती………..
प्रत्यक्ष पोलीस आयुक्तालयात हजर :- अधिकारी 337 पोलीस अंमलदार 1530
पहिला डोस घेतलेले :- अधिकारी 334 अंमलदार 1513
दुसरा डोस घेतलेले :- अधिकारी 336 अंमलदार 1519
पहिला डोस न घेतलेले :- अधिकारी 3 अंमलदार 17
दुसरा डोस न घेतलेले :- अधिकारी 1 अंमलदार 11
आरोग्यसेवकही कोरोनाबाधित……….
मिळालेल्या माहितीनुसार, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आठ हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉक्टर्स, परिचारिका, वार्ड बॉय, आया व इतर कर्मचारी असे एकूण 37 आरोग्यसेवक कोरोनाबाधित झाले आहेत.