

बेकायदेशीर नाहरकत दिल्याचा नागरिकांचा आरोप

मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे साठी लागणारे गौण खनिज यासाठी पालघर तालुक्यात बेसुमार खदाणी सुरू केल्या आहेत. खडकोली गावातील या प्रकल्पासाठी सुरू केलेल्या दगड खाणीतील ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खाण सुरू करण्यासाठी दिलेला ना हरकत दाखला बेकायदेशीर असून तक्रारीनंतरही खाणीतून दगडाचे उत्खनन सुरूच असल्याने संतप्त गावकऱ्यांनी खाणीचा रस्ता रोखून धरला होता.पोलिसांच्या मध्यस्थी नंतर ग्रामस्थांनी माघार घेतली.
खडकोली गावातील गट क्रमांक 187,185,177अ,177ब, या जमिनीवर दगड काढण्याचे काम सुरू केले असून लगतचा नैसर्गिक नाला बुजवण्यात आला आहे. खाणीचा पोहोच रस्ता वन विभागाच्या जागेतून जात असतानाही वनविभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.या ठिकाणी बांधण्यात आलेली विहीर ही नष्ट करण्यात आली आहे. दगड खाणीत होत असलेल्या उच्च क्षमतेच्या ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खाणीतील सुरुंग स्फोटामुळे ग्रामस्थांच्या जीवाला धोका असल्याने दगड खाण बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीदार,ग्रामपंचायत केली आहे.
जीआर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमार्फत खडकोली येथील उत्खननाचे काम सुरू आहे राजरोसपणे कोणत्याही सुरक्षा साधनांचा शिवाय बोर ब्लास्टिंग सुरू आहे. या ब्लास्टिंगमुळे संपूर्ण गावात हादरे बसत असून नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. या ब्लास्टिंगमुळे खदानीतील खडी सदृश्य माती आजूबाजूच्या परिसरात कडून भात शेतीचे व बागायती चे नुकसान होत आहे येथे असलेल्या मोगरा शेती वर सिमेंट सदृश्य माती पसरल्याने मोगऱ्याचे नुकसान झाल्याचे आदिवासी शेतकऱ्यांनी म्हटले आहे. गावाला मोठी मोठी स्वप्ने दाखवून या कंपनीने खदान सुरू केली व त्यानंतर या स्वप्नांचा भंग केला याचबरोबरीने गावाचे पर्यावरण बिघडवण्याचे कामही या कंपनीमार्फत राजरोसपणे सुरू आहे त्यामुळे येथे असलेली खदानी चे काम तात्काळ बंद करावे अशी मागणी शेकडो ग्रामस्थांनी केली आहे.
जी.आर.इन्फ्रा व बी. एल.अग्रवाल इन्फ्रा या कंपनीने खडकोली गावातील आदिवासी खातेदाराच्या शेतजमिनीतुन दगड उत्खननाला २६ फेब्रुवारी २०२१ रोजी गणसंख्येअभावी रद्द झालेल्या ग्रामसभेच्या प्रोसेडिंगमध्ये फेरफार करून ग्रामस्थांची दुबार नावे आणि खोट्या सह्यांच्या आधारे कोरम पूर्ण झाल्याचे भासवून दगड उत्खननाला परवानगी असणारा ठराव संमत करण्यात आला होता.
● बेकायदा पद्धतीची ना हरकत दाखला घेऊन गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास सुरू आहे शेतकऱ्यांवर ही त्याचा थेट परिणाम जाणवून येतो खदान बंद केल्याशिवाय पर्याय नाही अन्यथा गावाचे मोठे नुकसान होईल
मिलिंद मुदेकर, तक्रारदार ग्रामस्थ,खडकोली
● खडकोली- वसरे ग्रामपंचायत ही पैसा ग्रामपंचायत असून या ठिकाणी कोणतेही काम करताना ग्रामसभेची पूर्व परवानगी घेणे बंधन कारक असताना नागरिकांचा या कंपनीला विरोध असतानाही कांद्याचे उल्लंघन करून नाहरकत दाखला दिला असल्याचा नागरिकांचा आरोप करण्यात येत आहे
परशुराम चावरा, ग्रामस्थ
● मंडळ अधिकारी यांच्याकडून संबंधित प्रकरणात चौकशी केली जाईल याचबरोबरीने नियमांची पायमल्ली केली असल्यास नियमानुसार नुसार कारवाई केली जाईल
सुनील शिंदे तहसीलदार पालघर
● पूर्वी अस्तित्वात असलेला बंधारा खदानी मुळे जमीनदोस्त झाला पिण्याच्या पाण्याची विहीर ही जमीनदोस्त केली आता खदानी मुळे संपूर्ण गावाला हादरे बसत आहेत प्लास्टिकमुळे खडी युक्त माती आजूबाजूच्या शेतात पसरल्यामुळे शेताचे मोठे नुकसान होत आहे आदिवासींच्या हक्कावर गदा आणली जात आहे – परशुराम चावरे,सामाजिक कार्यकर्ता