
प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील महानगरपालिकेची मालमत्ता असलेल्या एका खोलीच्या नूतनीकरणासाठी लाखो रुपये वायफळ खर्च केला गेल्याचे वृत्त आहे. सदर प्रकरणी सखोल निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी.
या बाबतची अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील सिद्धार्थ नगर, किल्ला बंदर रोड, वसई तहसील कार्यालयासमोर असलेल्या कृष्णा चाळीतील खोली क्र. ७ वर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने नूतनीकरणासाठी लाखो रुपये खर्च केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. याबाबत माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागितली असता मागितलेली माहिती निरंक असे उत्तर महानगरपालिकेकडून देण्यात आले. महानगरपालिकेने नूतनीकरणावर खर्च केला नसेल तर खर्च कोणी केला? याची चौकशी व्हावी.
प्रभाग समिती आय हद्दीतील शासकीय रुग्णालयाच्या मागे महानगरपालिका दवाखान्याकरिता इमारतीचे बांधकाम करीत असून गिरीश गोरखा हे महानगरपालिकेचे एक कर्मचारी मागील कित्येक वर्षांपासून त्या जागेवर रहात आहेत. त्यांच्या अनेक पिढ्या याच जागेवर रहात होत्या असा गिरीश गुरखा यांचा दावा आहे. गिरीश गुरखा यांना तेथून हटविण्याकरिता महानगरपालिका प्रयत्न करीत आहे. त्यांच्याकरिताच कृष्णा चाळीतील खोलीचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. कृष्णा चाळीतील खोलीच्या नूतनीकरणासाठी महानगरपालिकेकडून लाखो रुपये खर्च केला आहे. गिरीश गुरखा याने कृष्णा चाळीतील खोलीत जाऊन राहावे याकरिता महानगरपालिका त्याच्यावर दबाव आणत आहे. मात्र त्याला या खोलीचे मालकी करारपत्र लिहून दिले जात नसल्यामुळे गिरीश गोरखा तिथे जाण्यास तयार नाही.
गिरीश गुरखा यांना हटविण्याकरिता कृष्णा चाळीतील खोलीच्या नूतनीकरणासाठी लाखो रुपये बिना टेंडर खर्च करण्यात आलेला आहे. या प्रकरणात उप अभियंता प्रकाश साटम यांचे नाव समोर आले आहे. महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम विभागात फार मोठे घोटाळे झालेले आहेत आणि त्यात उप अभियंता प्रकाश साटम यांच्या नावाची चर्चा आहे. सर्व घोटाळे एका मागोमाग एक करून बाहेर काढू.
गिरीश गुरखा मागील अनेक वर्षांपासून सफाई कर्मचारी म्हणून पूर्वी ग्राम पंचायत, नंतर परिषद व आता महानगरपालिका सेवेत मुकादम म्हणून आहे. ज्या साफसफाई कामगारांची सेवा २५ वर्षे वा त्याहून अधिक काळ झालेली आहे अशा साफ सफाई कामगारांना मोफत घर देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे दि. २२ ऑक्टोबर २००८ चे परिपत्रक असून सदर परिपत्रकानुसार गिरीश गोरखा यांना वसई विरार शहर महानगरपालिकेने नियमानुसार मोफत घर द्यायला हवे. मात्र त्याला त्याच्या नावाने नवीन घर न देता राहत्या घरातून हटविण्याकरिता महानगरपालिका प्रयत्नशील दिसत आहे. घर खाली करण्याकरिता त्यांना वारंवार नोटीस, स्मरणपत्र दिली जात होती.
गिरीश गुरखा यांना हटविण्याकरिता उप अभियंता प्रकाश साटम यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, गिरीश गुरखा यांनी महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध वसई न्यायालयात दावा दाखल केला आहे. गिरीश गुरखा हे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याकरिता न्यायालयात गेले असता कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याबद्दल त्यांना दि. २५/१०/२०२१ च्या आदेशाने निलंबित करण्यात आले आहे. अन्याया विरुद्ध दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणे ही कार्यालयीन बेशिस्त कशी होते? घर खाली करण्याकरिता नोटीस देताना त्यांना त्यांच्या नावाचे घर देण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवणे आवश्यक होते. महानगरपालिका प्रशासन गिरीश गुरखा यांच्यावर अन्याय करीत आहे. हे सिद्ध होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी.